रोहन सातवीत शिकणारा एक हुशार, शांत आणि समजूतदार मुलगा होता. संस्कार संस्कृती चट्कन मनावर घेत असे. त्याला अभ्यासाबरोबरच खेळ, वाचन आणि चित्रकला यांचीही आवड होती. शाळा सुटल्यावर तो मित्रांसोबत मैदानात खेळत असे. त्यामुळे तो नेहमी आनंदी आणि उत्साही दिसत असे.
पण काही दिवसांपासून त्याने एक गोष्ट लक्षात घेतली. त्याचे मित्र आणि परिसरातील अनेक मुले सतत मोबाईलमध्ये गुंतून राहू लागली होती. शाळा सुटली की ते मैदानावर येण्याऐवजी घरात बसून गेम खेळत. काही मुले तर जेवत असतानाही मोबाईल पाहत असत. त्यामुळे त्यांचा अभ्यास कमी होऊ लागला, डोळे दुखू लागले आणि स्वभावही चिडचिडा होऊ लागला. शिवाय त्याला त्याच्या मनासारखे खेळायला मित्र मिळत नव्हते. त्याला खेळाची आवड होती. त्याचे मन त्याशिवाय शांत होत नसे. त्यात
एके दिवशी रोहनचा लहान भाऊ राहुल शाळेतून घरी आला आणि लगेच मोबाईल घेऊन गेम खेळू लागला. आईने त्याला अभ्यासासाठी सांगितले, पण त्याने ऐकले नाही. रोहनला याचे वाईट वाटले. आणि योगायोग म्हणजे दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी "मोबाईलचा योग्य वापर" या विषयावर चर्चा घेतली. शिक्षक म्हणाले, "मोबाईल हे एक उपयुक्त साधन आहे. त्यातून आपण नवीन गोष्टी शिकू शकतो, माहिती मिळवू शकतो. पण त्याचा अतिरेक केला तर त्याचे वाईट परिणाम होतात. वेळेचे नियोजन आणि संयम खूप महत्त्वाचे आहेत."
रोहनने शिक्षकांचे बोलणे मनात साठवून ठेवले. त्याने ठरवले की फक्त स्वतः चांगले वागून उपयोग नाही, तर इतरांनाही समजावून सांगायला हवे.
घरी आल्यावर त्याने राहुलशी प्रेमाने संवाद साधला. त्याला मोबाईलचे फायदे आणि तोटे समजावून सांगितले. त्यानंतर दोघांनी मिळून एक वेळापत्रक तयार केले. त्यात अभ्यास, खेळ, वाचन आणि थोडा मोबाईल वापर यांचा समावेश होता.
रोहनने मित्रांनाही एक छान कल्पना सांगितली. प्रत्येक रविवारी ते "नो मोबाईल एक तास" हा उपक्रम राबवू लागले. त्या वेळेत ते मैदानी खेळ खेळत, गोष्टी सांगत, चित्रे काढत आणि झाडांची काळजी घेत. सुरुवातीला काही मुलांना ते आवडले नाही, पण हळूहळू त्यांना त्यात मजा वाटू लागली.
काही आठवड्यांतच बदल दिसू लागला. राहुलचा अभ्यास सुधारला. मित्रांची एकाग्रता वाढली. मैदान पुन्हा मुलांच्या हास्याने भरून गेले. पालकांनाही आनंद झाला.
शाळेत वार्षिक सभेच्या दिवशी मुख्याध्यापकांनी या उपक्रमाची माहिती सर्वांसमोर सांगितली. त्यांनी रोहनला मंचावर बोलावले आणि त्याचा विशेष सत्कार केला.
मुख्याध्यापक म्हणाले, "रोहनने फक्त स्वतःची सवय बदलली नाही, तर मित्र आणि भावंडांनाही योग्य मार्ग दाखवला. अशा मुलांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतात."
सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात रोहनचे अभिनंदन केले. त्याला "समजूतदार विद्यार्थी पुरस्कार" देण्यात आला. रोहनला आनंद झाला, पण त्याहून अधिक आनंद त्याला याचा होता की त्याच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांनी मोबाईलचा योग्य वापर शिकला होता.
त्या दिवसापासून शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून मोबाईल वापरण्यास सुरुवात केली. अभ्यास, खेळ, वाचन आणि कुटुंबासोबतचा वेळ यांना त्यांनी अधिक महत्त्व दिले. मोबाईलच्या अधीन होणाऱ्या मुलांना ते बाहेर काडत. मुलेच मुलांना सुधारू लागली.
बोध : मोबाईल हे साधन आहे, जीवन नाही. त्याचा योग्य वापर केल्यास तो मित्र ठरतो, तर अतिरेक केल्यास तो अडथळा ठरतो. स्वतः सुधारून इतरांनाही योग्य मार्ग दाखवणे हीच खरी शहाणपणाची खूण आहे.

- सोनाली सु. पेडणेकर


