जादुई अळूवडी आणि 'काटेरी' पाहुणे!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
01st August, 11:02 pm
जादुई अळूवडी आणि  'काटेरी' पाहुणे!

पावसाळा आला की निसर्ग जणू हिरवा शालू नेसतो. रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर आणि ओलसर जागी डौलाने उभी असलेली अळूची विशाल पानं नजरेत भरतात. ही पानं पाहिली की घराघरात बनणाऱ्या गरमागरम अळूवडीची आठवण हमखास येते. पण कधी विचार केलाय का, इतकी चविष्ट अळूवडी बनवताना हातांना किंवा घशाला खाज का येते?

कशी करतात ही चविष्ट अळूवडी?

अळूच्या पानाला चिंच-गुळाच, आणि काही मसाले घालून बेसनाचं मिश्रण लावलं जातं, एकावर एक पान ठेवून हे मिश्रण नीट पसरवलं जातं. मग त्याची घट्ट गुंडाळी करून वाफवतात. छान उकडली की ती गुंडाळी काढून त्याचे काप केले जातात.

आणि शेवटी तव्यावर तेल गरम करून त्यावर तीळ घालून वड्या खमंग परतून घेतात. आणि अशी तयार होते खुसखुशीत, आंबट-गोड अळूवडी.

ही माहिती तर तुमच्यापैकी काहीजणांना माहित आहे. म्हणून आज एक वेगळी गंमत सांगणार आहे. तुम्हाला माहित आहे का?? अळू वडीची पानं धुताना, चिरताना किंवा काहीवेळा वडी खाताना हातांना, घशाला खाज येते. ती का येते माहित आहे?अळूच्या पानात इवले इवले 'काटेरी पाहुणे' लपलेले असतात हे काटे असतात कॅल्शियम ऑक्सलेट चे, ते आपल्या मऊ त्वचेला, घश्याला टोचले की खाज येते. ही खाज येऊ नये म्हणून आई - आजी युक्ती वापरतात.

 त्या अळूची पानं चिरताना हातांना आधी खोबरेल तेल लावतात. 

 त्यानंतर अळू शिजवताना त्यात चिंचेचा कोळ किंवा कोकम घातले जाते. चिंच आणि कोकम घातले असता हे काटेरी पाहुणे विरघळतात आणि टोचत नाहीत. 

 त्याचप्रमाणे अळू व्यवस्थित शिजवले जाते. हे उपाय केले असता खाज येत नाही आणि आपण अळूवडी ताव मारून खाऊ शकतो. 

या गोष्टी लक्षात ठेवा आणि अळूचे विविध पदार्थ खाऊन बघा.


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य