Home >> हुप्पा हुय्या >> चिखलातली मस्ती आणि पायांची सेफ्टी

चिखलातली मस्ती आणि पायांची सेफ्टी

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
11th July, 10:53 pm
चिखलातली मस्ती आणि पायांची सेफ्टी

​पावसाळा आला की सगळीकडे हिरवळ आणि पाणी पहायला मिळते. शाळेतून मित्रांबरोबर घरी येताना, पाण्याने भरलेल्या डबक्यांमध्ये उड्या मारत पाणी उडवायला मजा येते. पण या मजेबरोबरच आपल्या पायांची पावसाळ्यात विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

पावसाळ्यात रस्त्यावर, शाळेच्या मैदानात आणि घराबाहेर सगळीकडे ओलावा आणि चिखल असतो. आपले पाय अनेकदा ओले होतात आणि बूट किंवा सँडल ही ओलसर राहतात. या ओलाव्यामुळे पायांवर जंतू आणि बुरशी वाढण्याची शक्यता खूप वाढते. यामुळे पायांना खाज सुटणे, चिखल्या होणे किंवा बोटांमध्ये त्वचा सोलवटणे असे त्रास होऊ शकतात.

हे त्रास होऊ नये म्हणून काय करावं?

१. शाळेतून घरी आल्यावर पाय स्वच्छ धुवावे

 पाय धुवायला गरम पाणी वापरल्यास अधिक चांगले. पायाची बोटं, तळवे आणि बोटांच्या मधली जागा नीट स्वच्छ करा.

२. पाय पूर्ण कोरडे करा

विशेषतः बोटांच्या मधली जागा, कारण तिथे ओलावा राहिल्यास जंतू संसर्ग लवकर वाढतो.

३. ओले मोजे आणि बूट लगेच बदला

ओले सँडल जास्त वेळ पायात ठेवू नका.

४. स्वतःचे सँडल/चप्पल/बूट वापरा

इतरांचे सँडल/चप्पल वापरणं टाळा. ज्यांचे बूट/चप्पल/सँडल घालणार त्यांच्या पायांना त्वचारोग असल्यास तो रोग दुसऱ्यांना पसरू शकतो.

५. नखं वेळोवेळी कापा

 लांब नखांमध्ये माती आणि जंतू साचतात. आणि त्वचा रोग लवकर होतात.

६. पावसाचे पाणी साचून राहील अशा प्रकारचे बूट किंवा सँडल वापरणे टाळा. त्याऐवजी पावसाचे पाणी सहज बाहेर निघून जाईल असे बूट किंवा सँडल वापरा.

७. रात्री झोपताना पायांना कोमट तीळ तेलाने मालिश करा. पायांना तेल लावल्याने पावलांचे थंडाव्यापासून रक्षण होते आणि पायांची त्वचा सुद्धा निरोगी राहते.

८. सँडल किंवा बूट न घालता पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये उडी मारू नका किंवा चालू नका. अशा खड्ड्यांमध्ये काचेचे तुकडे, खिळे किंवा इतर धारदार वस्तू असू शकतात, ज्यामुळे पायाला गंभीर दुखापत होऊ शकते. त्यामुळे नेहमी योग्य पादत्राणे घाला आणि काळजी घ्या.

जर पायांची योग्य काळजी घेतली नाही, तर छोटे इन्फेक्शनही मोठा त्रास देऊ शकतात. मित्रांनो, या पावसाळ्यात पाऊस, चिखल आणि मस्ती जरूर एन्जॉय करा, पण घरी आल्यावर पाय स्वच्छ धुवायला आणि कोरडे ठेवायला अजिबात विसरू नका.

आणि हं पायांच्या त्वचेला काही त्रास जाणवत असल्यास लगेच जवळच्या वैद्यांना भेटा आणि उपचार सुरू करा.

- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य