
शाळेत जाणं म्हणजे मज्जा असते. मित्र- मैत्रिणी, खेळ, अभ्यास यात वेळ कसा जातो कळतंच नाही. शाळेत शिकत असताना, खेळताना काही गोष्टींची काळजी मात्र घ्यावी लागते. काळजी घेतली नाही तर सर्दी, ताप, पोटदुखी असे त्रास होतात. हे का होतं माहीत आहे का? कारण आपल्या काही छोट्या चुकीच्या सवयी असतात. या सवयी बदलल्या तर आजारपण खूप कमी होईल.
या सवयी आहेत तरी कोणत्या ते आज बघूया.
१. एकमेकांच्या वस्तू वापरू नका
रुमाल, पाण्याची बाटली, टिफिन, चमचा या गोष्टी स्वतःच्याच वापरा. दुसऱ्यांच्या वस्तू वापरल्याने जंतू लवकर पसरतात. पेन-पेन्सिल सुद्धा काही मुलं तोंडात घालतात. वस्तू तोंडात घालणंही चुकीचं आहे. त्यावर अनेक जंतू असतात. जे तोंडा वाटे आपल्या शरीरात जाऊन रोग तयार करू शकतात.
डबा शेअर करताना त्यातील पदार्थ उष्टवायच्या आधी ते मित्रांना द्या. उष्टे पदार्थ खाल्ल्यास रोग जंतू पसरतात.
२. पुस्तकाची पानं उलटताना
पानं उलटताना थुंकी लावून बोट पुस्तकाच्या पानांना थुंकी लावू नका. यातून जंतू थेट तोंडात जातात. त्याऐवजी बोट किंचित ओलं करण्यासाठी ओला स्पंज किंवा रुमाल वापरा.
३. स्वच्छतेच्या सवयी
शौचालय वापरल्यानंतर हात नीट धुवा. ही एक सवय अनेक आजार दूर ठेवते.
शिंक आली असता तोंडावर रुमाल धरा, रुमाल नसेल तर हाताच्या कोपरात शिंका.
४. खाऊ खिशात ठेऊ नका
काहीजणांना खाऊ खिशात ठेवायची सवय असते. उदा. शेंगदाणे, शेव, फुटाणे इ. हे पदार्थ खिश्यात तसेच राहतात आणि त्यावर फंगस वाढतो. असे पदार्थ चुकून खाल्ल्यास पोटाच्या तक्रारी सुरू होतात.
या छोट्या छोट्या सवयी म्हणजे फक्त नियम नाहीत. हे तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. निरोगी राहिलात तर खेळाल, शिकाल आणि आनंदी रहाल!

वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य