पावसाळी आरोग्य: घरगुती प्रथमोपचार किट

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
06th June, 11:05 pm
पावसाळी आरोग्य: घरगुती प्रथमोपचार किट

पाऊस आला की मस्त वाटतं ना? पावसाळ्याची आत्ताच चाहूल लागली आहे. आता आपण या ऋतूत निरोगी राहण्यासाठी तयारी केली पाहिजे. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, जखमा या गोष्टी लवकर होतात. म्हणून आपण आत्ताच या ऋतूत निरोगी राहण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे. आपल्या घरात आधीपासूनच काही गोष्टी तयार असल्या, तर छोट्या-मोठ्या त्रासांवर लगेच उपाय करता येतो. आज आपण एक घरगुती पावसाळी प्रथमोपचार किट बनवायला शिकूया.

​आपल्या किटमध्ये काय असावं?

​१. हळद: उष्ण गुणाची आणि जंतूनाशक असल्यामुळे पावसाळ्यात वेगवेगळ्या तक्रारींवर उपयोगी आहे. जखम झाली, खरचटलं किंवा सूज आली तर हळद लगेच वापरता येते. कोणी पावसात घसरून पडलं आणि लागलं, तर त्या वेदना असलेल्या भागावर हळद आणि तेल एकत्र करून लावलं असता वेदना कमी होतात. कोरडा खोकला असेल तर गरम दुधात चिमूटभर हळद घालून घेतल्यास आराम मिळतो.

​२. तुळस: खोकला, सर्दी यांवर तुळशीचा काढा उत्तम. ४-५ तुळशीची पानं, छोटासा आल्याचा तुकडा, २ कप पाणी हे सर्व उकळून १ कप शिल्लक ठेवावे. कोमट झाल्यावर गाळून त्यात १ चमचा मध घालून प्यायल्याने फायदा होतो.

​३. खोबरेल तेल: छोटी जखम, डास चावणे, खाज येणे यावर खोबरेल तेल लावल्याने आराम मिळतो.

​४. सुंठ: पोट दुखणं, अपचन, सर्दी यावर सुंठ चूर्ण गरम पाण्यात घालून किंवा मधातून घेणं फायदेशीर ठरतं.

​५. मध: घसा दुखत असेल तर चमचाभर मध खावा. खोकल्यावर मध १ चमचा, तुळशीचा रस १/२ चमचा, आल्याचा रस १/४ चमचा हे मिश्रण घेतले असता घसा निरोगी राहतो.

​६. ओवा: पोट फुगणं, गॅस, पोटात गुडगुड या तक्रारी पावसाळ्यात जास्त असतात. २ चिमूट ओवा चावून खाणं किंवा गरम पाण्यात टाकून पिणं लगेच आराम देतं.

​७. सैंधव मीठ: घसा खवखवत असेल तर कोमट पाणी १ कप + सैंधव मीठ १/४ चमचा असे एकत्र करून गुळण्या केल्याने वेदना आणि खवखव कमी होते.

​अशा सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी तयार ठेवा आणि पावसाळ्याचा आनंद लुटायला तयार राहा!


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य