Home >> हुप्पा हुय्या >> दया, माया आणि त्यांचे शूर मित्र

दया, माया आणि त्यांचे शूर मित्र

Story: छान छान गोष्ट |
27th June, 11:38 pm
दया, माया आणि त्यांचे शूर मित्र

एका गावात एक मोठे घर होते. त्या घराला एक वेगळेच महत्त्व होते. त्या घरात दया आणि माया हे भाऊ-बहीण राहत होते. ते आनंदाने नांदत होते. दोघेही खूप हुशार, प्रेमळ आणि कोणाच्याही मदतीला धावून जाणारे होते. ते आपल्या आई-वडिलांसोबत एकत्र कुटुंबात राहत होते. घरात आजी-आजोबा, काका-काकू आणि चुलत भावंडेही होती. त्यामुळे घर नेहमी गजबजलेले असे. ते एक कुटुंबवत्सल घर होते. दया आणि मायाला प्राण्यांची खूप आवड होती. म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांची आवड पूर्ण केली होती. त्यांनी एक कुत्रा आणि एक मांजर पाळले होते. कुत्र्याचे नाव 'मोती' आणि मांजराचे नाव 'मिनी' होते. दोघेही त्यांचे जिवाभावाचे मित्र होते.

दया आणि माया रोज त्यांच्यासोबत खेळत, त्यांना खाऊ घालत आणि नवीन गोष्टी शिकवत. त्यांनी मोतीला घराचे रक्षण करायला शिकवले होते, तर मिनीला काही संशयास्पद दिसले की मोठ्यांना सावध करायला शिकवले होते. कोणतेही संकट आले तरी धाडसाने त्याचा सामना कसा करावा, हे त्यांनी त्यांना शिकवून तयार केले होते. मोती आणि मिनीही खूप हुशार होते. ते आपल्या छोट्या मालकांचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत.

एकदा काय झाले, एके रात्री सर्वजण गाढ झोपले होते. पावसाचे दिवस होते आणि बाहेर वारा जोरात वाहत होता. त्याच आवाजात अचानक स्वयंपाकघराच्या बाजूने हलकासा आवाज आला. एक चोर घराच्या मागच्या दरवाजातून आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. सगळे झोपेत असल्यामुळे कोणालाच काही कळले नाही. पण मिनीच्या तीक्ष्ण कानांनी तो आवाज ऐकला आणि ती लगेच स्वयंपाकघराकडे धावली. तिने चोराला पाहिले आणि जोरात "म्याव... म्याव..." ओरडायला सुरुवात केली.

मिनीचा आवाज ऐकून मोतीलाही जाग आली. त्याने परिस्थिती लगेच ओळखली आणि तो दरवाजासमोर उभा राहून मोठ्याने भुंकू लागला, "भौ! भौ! भौ!" त्याने आपले भुंकणे थांबवले नाही. त्याचा तो रौद्र आवाज ऐकून घरातील सर्वजण जागे झाले. दया आणि माया धावत बाहेर आले. काका आणि बाबा देखील ताबडतोब तिथे पोहोचले. मोती चोराला घरात येऊ देत नव्हता; तो चोराला पकडण्यासाठी सज्ज झाला होता. परिस्थिती हाताबाहेर गेलेली पाहून घाबरलेल्या चोराने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत शेजारीही जागे झाले होते. सर्वांनी मिळून चोराला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

सकाळी सगळे जण मोती आणि मिनीचे कौतुक करू लागले. आजी म्हणाल्या, "हे दोघे फक्त पाळीव प्राणी नाहीत, तर आपल्या घराचे खरे रक्षक आहेत." आजींचे हे बोल ऐकून दया आणि मायाच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले. त्यांनी मोती आणि मिनीला प्रेमाने मिठी मारली. त्या दिवशी त्या दोघांना खास खाऊही मिळाला. दया आणि मायाने त्यांना दिलेल्या योग्य शिक्षणाचा आज खरा फायदा झाला होता.

ही गोष्ट वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. त्या दिवसापासून गावभर मोती आणि मिनीच्या शौर्याचीच चर्चा सुरू झाली. आपण प्राण्यांना जे काही प्रेमाने शिकवतो, त्याचा किती मोठा उपयोग होऊ शकतो, हेच यातून सिद्ध झाले होते.

बोध: प्राण्यांवर प्रेम करा आणि त्यांची काळजी घ्या. प्राण्यांना प्रेम आणि योग्य प्रशिक्षण दिल्यास, तेही आपल्या कुटुंबाचे खरे रक्षक बनू शकतात.

- सोनाली सु. पेडणेकर