
मित्रांनो, तुम्ही रोज शाळेचा अभ्यास, गृहपाठ किंवा वाचन करताना बराच वेळ बसता, हो ना? पण अभ्यास करताना कसे बसावे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. योग्य पद्धतीने बसणं हे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
बरीच मुलं अभ्यास करताना पाठ वाकवून, मान खाली टाकून किंवा एका बाजूला कलंडून बसतात, काहीजण चक्क सोफ्यावर लोळत अभ्यास करतात. सुरुवातीला यामुळे काही जाणवत नाही, पण सतत चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे पाठदुखी, मानदुखी, खांदे दुखणे आणि पाठीचा कणा वाकडा होण्याची शक्यता असते. म्हणून लहानपणापासूनच योग्य सवय लावणं गरजेचं आहे.
अभ्यासाला बसताना या गोष्टी लक्षात ठेवा:
पाठ सरळ ठेवा - खुर्चीला टेकून, पाठीचा कणा ताठ ठेवून बसा. वाकून बसू नका. जमिनीवर बसत असाल तर वही, पुस्तक ठेवण्यासाठी समोर छोटं टेबल ठेवा.
दोन्ही पाय जमिनीला टेकलेले असावेत – पाय लोंबकळत ठेवू नका, यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो, आणि पाय दुखू शकतात.
टेबल आणि खुर्चीची उंची योग्य असावी – टेबल फार उंच किंवा खुर्ची फार खाली नसावी. टेबल किंवा खुर्चीची उंची चुकीची असल्यास खांदे दुखू शकतात.
वहीपासून डोळ्यांचे अंतर योग्य ठेवा - साधारण एक हाताचं अंतर ठेवा, खूप जवळ जाऊन वाचू नका.
दर ३०-४० मिनिटांनी थोडा ब्रेक घ्या - उठून थोडं चालणं, हात-पाय ताणणं यामुळे शरीराला आराम मिळतो. एक छोटासा योगासनांचा ब्रेक घ्या. त्यात ताडासन, त्रिकोणसन, गोमुखासन, सेतूबंधासन अशी सोपी आसनं करा. ही आसनं केल्याने पाठीचे स्नायू मोकळे होतात, पाठ दुखी होत नाही आणि रिलॅक्स वाटतं.
मोबाईल किंवा टॅबवर वाचताना मान खाली वाकवू नका - स्क्रीन डोळ्यांसमोर, सरळ रेषेत ठेवा.
खूप तास बसून अभ्यास करायचा असल्यास - मऊ कुशन खुर्चीवर ठेवून त्यावर बसा जेणेकरून कंबरेला त्रास होणार नाही.
योग्य स्थितीत बसल्याने शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सुरळीत राहतो आणि थकवा कमी जाणवतो. चुकीच्या बैठकीमुळे लक्ष केंद्रित करणंही कठीण होतं.
तर मित्रांनो, आजपासूनच सरळ बसण्याची सवय लावा. योग्य बैठक म्हणजे फक्त शिस्त नाही, तर तुमच्या निरोगी आणि मजबूत शरीरासाठी आवश्यक सवय आहे.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य