राग आला की शरीरात काय होतं?

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
24th October, 10:34 pm
राग आला की  शरीरात काय होतं?

कधी तुमच्या खूप आवडत्या गोष्टीला कोणी तुम्हाला न सांगता हात लावला म्हणून राग येतो, तर कधी खेळताना कोणी तुम्हाला हरवलं म्हणून, तर कधी कोणी तुम्हाला न आवडणारे शब्द बोलले म्हणून. अशा वेळी चेहरा लाल होतो, हाताच्या मुठी घट्ट होतात, हृदयाची धडधड वाढते आणि मोठ्याने ओरडावेसे वाटते. असं का होतं, याचा कधी विचार केला आहे?

आपल्या भावना आणि शरीर यांचा खूप जवळचा संबंध असतो. आपल्याला राग, भीती, आनंद किंवा दुःख अशा वेगवेगळ्या भावना जाणवतात. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की आपल्याला राग येऊ शकतो. अशा वेळी मेंदू शरीराला सावध होण्याचा संदेश देतो. त्यामुळे हृदयाचे ठोके आणि श्वासाचा वेग वाढू शकतो. स्नायू ताणले जातात आणि शरीर काहीतरी कृती करण्यासाठी तयार होते. ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.

राग येणे चुकीचे नाही. पण राग आल्यावर आपण काय करतो, हे महत्त्वाचे आहे. रागाच्या भरात मित्राला मारणे, वस्तू फेकणे किंवा वाईट शब्द बोलणे यामुळे इतरांना दुखापत होऊ शकते आणि मैत्रीत दुरावाही निर्माण होऊ शकतो.

मग राग आला तर काय करायचे?

राग आला की लगेच ओरडण्याऐवजी थोडे थांबायचे. हळूहळू श्वास आत घ्यायचा आणि सोडायचा. मन शांत झाल्यावर आपल्याला काय वाईट वाटले, हे शब्दांत सांगायचे. उदाहरणार्थ, “तू माझी पेन्सिल विचारल्याशिवाय घेतलीस, त्यामुळे मला राग आला,” असे शांतपणे सांगता येते.

कधी कधी खेळणे, चित्र काढणे, आवडते गाणे ऐकणे किंवा विश्वासू व्यक्तीशी बोलणे यामुळेही मन हलके होऊ शकते. राग वारंवार अनावर होत असेल, तर आई-बाबा, शिक्षक किंवा अन्य विश्वासू मोठ्या व्यक्तीची मदत घ्यावी. कारण वारंवार राग अनावर होत गेला तर मनाचे आरोग्य बिघडते. आणि शरीराचे सुद्धा आरोग्य बिघडते. शरीरात उष्णता, पित्त वाढते, त्यामुळे डोकेदुखी, स्नायूंचे दुखणे, तोंड येणे, पोट बिघडणे असे त्रास होऊ शकतात. 

शरीर निरोगी ठेवण्याबरोबरच मन प्रसन्न आणि संतुलित ठेवणेही आवश्यक आहे. पुरेशी झोप, नियमित खेळ, योग्य आहार आणि शांतपणे संवाद साधण्याची सवय मनाचे स्वास्थ्य जपण्यास मदत करतात.

लक्षात ठेवा, राग आला म्हणून तुम्ही वाईट मुलं होत नाही. राग ही एक भावना आहे. ती ओळखणे, तिच्यामागचे कारण समजून घेणे आणि योग्य प्रकारे व्यक्त करणे हे मात्र शिकले पाहिजे. 

चला तर मग, रागाला आपल्यावर राज्य करू न देता, आपणच आपल्या रागावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करूया.