गरमागरम चपातीवर तूप-साखर लावून खायला तुम्हाला आवडतं का? की चटणीसोबत खुसखुशीत भाकरी खायला? की दही किंवा लोणच्यासोबत गरमागरम आलू पराठा?
चपाती, भाकरी आणि पराठा हे आपल्या ताटातले तीन पदार्थ दिसायला थोडे सारखे, पण प्रत्येकाची चव, बनवण्याची पद्धत आणि खासियत वेगळी आहे. आपल्या घरात रोजच्या जेवणात यापैकी एखादा पदार्थ नक्कीच असतो.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का, चपाती आणि भाकरीमध्ये काय फरक असतो? भाकरीचे किती प्रकार असतात? पराठा पचायला जड का वाटतो? आणि आपल्या शरीरासाठी यापैकी कोणता पदार्थ कधी खाणे योग्य असते?
चला तर मग, आपल्या ताटातील या तीन चविष्ट पदार्थांची ओळख करून घेऊया आणि जाणून घेऊया काही आरोग्यदायी गोष्टी.
चपातीला रोटी असं सुद्धा म्हटलं जातं. गव्हाची चपाती किंवा फुलका आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी असते. पण तुम्हाला माहीत आहे का? हरभऱ्याच्या पीठाची चणक रोटीका , मैद्यापासून केलेली पोलिका, उडदाच्या पिठापासून केलेली बलभद्रिका इ. अनेक प्रकार सुद्धा आहेत. आज आपण जी रोज खातो ती गव्हाची रोटी. गरम गरम रोटी तूप साखर लावून त्याचा छान रोल करून तुम्ही कधी खाल्ला आहे का??? अजून खाल्ला नसेल तर नक्की खाऊन बघा. ही गव्हाची रोटी चविष्ट तर आहेच त्याचबरोबर ती पौष्टिक म्हणजेच शरीराला ताकद देणारी आहे. ही रोटी खाल्ल्याने वजन सुद्धा वाढायला मदत होते. चपाती किंवा फुलका नारळाची चटणी, पुदिना कोथिंबीर घालून केलेली हिरवी चटणी, वेगवेगळ्या भाज्या, कडधान्यांच्या उसळी, केळीचा, आंब्याचा, अननसाचा हलवा अशा पदार्थांबरोबर खावी. त्याचबरोबर चपातीचे काही चटपटीत पदार्थ सुद्धा केले जातात जसे की फ्रँकी, पिझ्झा, रोल, चिवडा इ. पदार्थ सुद्धा कधीतरी मज्जा म्हणून खायला हरकत नाही.
दुसरा प्रकार आहे भाकरी. आपल्या गोव्यातील खास आहे तांदळाची किंवा नाचणीची भाकरी. कांदा, हिरवी मिरची, ओली कोथिंबीर घालून केलेली तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी चविष्ट आणि पौष्टिक आहे. शरीराला ऊर्जा देणारी आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी मात्र नाचणीची भाकरी खावी. गरमा गरम नाचणीच्या भाकरी लोण्याचा गोळा किंवा साजूक तूप घालून खावी. रव्याची भाकरी सुद्धा कांदा, किसलेला गाजर किंवा बीट, किंवा ओले खोबरे घालून केली जाते. संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी ही भाकरी गोव्यात खाल्ली जाते. बाजरीची भाकरी सुद्धा केली जाते जी गुणाने उष्ण म्हणजेच गरम आहे म्हणून ती उन्हाळ्यात खाऊ नये. इतर ऋतुंमध्ये नक्की खाऊन बघावी.
भाकरी ही पचायला गव्हाच्या चपातीपेक्षा सोपी असते.
तिसरा प्रकार आहे पराठा. पराठा हा खरंतर भारतातील जे थंड प्रदेश आहेत तिथे विशेषतः हिवाळ्यात केला जातो. आलू पराठा, लच्छा पराठा, पनीर पराठा, मेथी पराठा, पालक पराठा, लौकी पराठा असे अनेक प्रकार केले जातात. तुम्हाला सुद्धा आलू पराठा - दही, लोणचे किंवा टोमॅटो सॉस बरोबर खायला आवडतं का? पराठा हा सुद्धा पौष्टिक आहे परंतु तो पचायला जड आहे. त्यामुळे कधीतरी खायला हरकत नाही आणि खूपंच आवडत असेल तर त्यातल्या त्यात पचायला सोपे प्रकार म्हणजे मेथी पराठा, कोकण दुधी पराठा किंवा तायकिळ्याचा पराठा. पराठा करताना खूप तेल किंवा तूप लावून तव्यावर शेकून भाजला जातो म्हणून तो पचायला जड असतो. त्यामुळे एकावेळी खूप पराठे किंवा रोज पराठे खाणे टाळावे.
गरमागरम चपाती, भाकरी, पराठा खा आणि धष्टपुष्ट व्हा.



