दोन मित्र आणि बदललेली वेळ

Story: छान छान गोष्ट |
03rd October, 10:36 pm
दोन मित्र आणि बदललेली वेळ

एका शाळेत दोन जिवलग मित्र शिकत होते. दोघेही खूप हुशार, स्वभावाने चांगले आणि मनाने समजूतदार होते. त्यांच्या आई-बाबांना आपल्या मुलांचा खूप अभिमान होता.

लहानपणापासूनच त्यांच्या पालकांनी त्यांना चांगले संस्कार, शिस्त आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले होते.

“शिकणे महत्त्वाचे आहे; पण चांगला माणूस होणे त्याहून महत्त्वाचे आहे,” असे ते नेहमी सांगत.

दोन्ही मित्र अभ्यासातही चांगले होते. त्यापैकी एक मित्र एका शिकवणी वर्गात सुरुवातीपासूनच अव्वल होता. त्याची हुशारी, अभ्यासातील सातत्य आणि प्रश्न विचारण्याची पद्धत पाहून शिकवणी शिक्षकांचा त्याच्यावर विशेष विश्वास होता.

पण हळूहळू दोन्ही मित्र मोठे होत गेले.

वाढत्या वयाबरोबर त्यांच्या आवडीनिवडी बदलू लागल्या. मित्रांशी गप्पा, खेळ, मोबाईल, नवीन गोष्टी यामध्ये त्यांचा वेळ अधिक जाऊ लागला. अभ्यासाचे महत्त्व त्यांना माहीत होतेच; पण अभ्यासासाठी लागणारा वेळ आणि एकाग्रता कमी होत गेली. त्यांच्या बदलाची चाहूल लागली.

सर्वप्रथम शाळेतील शिक्षकांच्या लक्षात हा बदल आला.

“मुले हुशार आहेत; पण हल्ली वर्गात त्यांचे लक्ष थोडे कमी आहे,” असे त्यांनी पालकांना सांगितले.

पालकांनी मुलांवर रागावण्याऐवजी त्यांचे निरीक्षण करायला सुरुवात केली.

शाळेच्या बसमधूनही काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. मुलांचा बराच वेळ गप्पा, गंमत आणि इतर गोष्टींमध्ये जात होता. सकाळची घाई आणि रात्री उशिरापर्यंत जागण्यामुळे त्यांचा दिवसही थोडा विस्कळीत झाला होता.

पालकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला.

“मुले समजूतदार आहेत, मग अभ्यासात असा बदल का?” शिकवणी शिक्षकाने पाहिले.

दरम्यान, दुसरा मित्रही त्याच शिकवणी वर्गात आला. शिकवणी शिक्षकांनी दोन्ही मित्रांचे बारकाईने निरीक्षण केले. पूर्वी अव्वल असणारा मुलगा आता अभ्यासात तितका उत्साही दिसत नव्हता. गृहपाठात सातत्य नव्हते. वर्गात लक्ष कधी असे, तर कधी नसे. दुसऱ्या मित्राचीही अशीच अवस्था होत होती.

शिक्षकांनी त्यांना प्रेमाने अनेकदा समजावले.

“तुम्ही दोघेही हुशार आहात. तुमच्यात क्षमता आहे. फक्त अभ्यासाकडे पुन्हा लक्ष द्या.”

मुले ऐकत होती. मान डोलावत होती. पण काही दिवसांनी पुन्हा त्याच गोष्टी घडत होत्या.

तेव्हा शिक्षकांनी विचार केला. ‘समस्या मुलांच्या बुद्धीची नाही आणि त्यांच्या संस्कारांचीही नाही. समस्या त्यांच्या बदललेल्या दिनक्रमाची असावी.’ म्हणून शिक्षकाने उपाय केला.

शिक्षकांनी दोन्ही मुलांच्या पालकांशी सविस्तर संवाद साधला. ते म्हणाले,

“मुलांना फक्त अभ्यास करायला सांगून उपयोग होणार नाही. आपण आधी त्यांचा संपूर्ण दिवस समजून घ्यायला हवा . ते किती वाजता उठतात, शाळेतून कधी येतात, बसचा प्रवास किती असतो, खेळासाठी किती वेळ देतात, मोबाईल किंवा इतर गोष्टींसाठी किती वेळ जातो, शिकवणी कधी असते आणि रात्री किती वाजता झोपतात.हे सगळे पाहणे गरजेचे आहे.”

पालक लक्षपूर्वक ऐकत होते. शिक्षक पुढे म्हणाले,

“त्यांच्या वेळा बदलल्या आहेत. म्हणून आपण त्यांना बदलण्यापेक्षा त्यांचा दिनक्रम बदलूया .”

त्यांनी काही ठोस उपाय सांगितले.

“शाळेतून घरी आल्यानंतर लगेच अभ्यासाला बसवू नका. आधी थोडी विश्रांती आणि जेवण द्या. त्यानंतर अभ्यासासाठी एक निश्चित वेळ ठेवा. त्या वेळेत मोबाईल, टीव्ही किंवा इतर व्यत्यय बाजूला ठेवा.”

“तसेच, सतत दोन-तीन तास अभ्यास करण्यापेक्षा अभ्यासाचे छोटे भाग करा. मध्ये थोडी विश्रांती द्या. मुलांना खेळण्यासाठीही वेळ द्या. कारण खेळ आणि विश्रांतीही मुलांच्या वाढीसाठी तितकीच महत्त्वाची आहे.”

“आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रात्रीची झोप योग्य वेळेत होऊ द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ताजेतवाने उठले, तर शाळेतही लक्ष चांगले लागेल.”

शिक्षकांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली,

“मुलांच्या गुणांवरच लक्ष केंद्रित करू नका. त्यांच्या प्रयत्नाकडे लक्ष द्या असे झाले. एक दिवस अभ्यास कमी झाला म्हणून रागावण्यापेक्षा, दुसऱ्या दिवशी त्याने वेळेवर अभ्यास केला तर त्याचे कौतुक करा.”

पालकांना शिक्षकांचा हा उपाय मनापासून पटला. मुलांनीही साथ दिली. पालकांनी दोन्ही मुलांशी शांतपणे चर्चा केली.

“तुम्हाला काहीही बंद करायचे नाही. खेळायचे असेल तर खेळा, मित्रांशी बोलायचे असेल तर बोला. पण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवूया,” असे त्यांनी सांगितले.

मुलांना ही पद्धत आवडली.

कारण त्यांना सतत “अभ्यास करा, अभ्यास करा” असे सांगितले जात नव्हते. उलट त्यांच्या दिवसातील प्रत्येक गोष्टीला योग्य जागा दिली जात होती. दोन्ही मित्रांनीही ठरवले, वेळ आपणच सांभाळायची आणि आपल्या अभ्यासाची जबाबदारीही आपणच घ्यायची. काही दिवस त्यांनी नवीन दिनक्रम पाळला.

सुरुवातीला थोडे अवघड गेले. पण हळूहळू त्यांना त्याची सवय झाली. काही आठवड्यांनी बदल स्पष्ट दिसू लागला. शाळेत त्यांचे लक्ष वाढले. बसचा वेळही आता अधिक शिस्तीत जाऊ लागला.

शिकवणीमध्ये गृहपाठ वेळेवर होऊ लागला. प्रश्न विचारण्याची सवय पुन्हा आली. आणि पूर्वी अव्वल असणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासही परत आला.

एक दिवस शिकवणी शिक्षकांनी दोन्ही मित्रांकडे पाहून विचारले,

“काय मंडळी, आता कसं वाटतंय?”

दोघेही हसले.

“छान सर! आता आम्हाला कळलंय की अभ्यास जास्त करण्यापेक्षा वेळ योग्य पद्धतीने वापरणे महत्त्वाचे आहे.”

शिक्षकही हसले.

“बस्स! तुम्हाला हे समजलं, म्हणजे माझं काम झालं.”

त्या दिवसापासून दोन्ही मित्रांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली,  वाढत्या वयात बदल होणे स्वाभाविक आहे. पण त्या बदलांना योग्य दिशा देण्यासाठी स्वतःच्या वेळेचे आणि सवयींचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. आणि त्यांच्या पालकांना हेही जाणवले, मुले चुकली म्हणून त्यांना थांबवायचे नसते; योग्य वेळी त्यांचा हात धरून त्यांना पुन्हा योग्य वाटेवर आणायचे असते.

बोध : “मुलांना फक्त शिकवायचे नसते, तर त्यांना समजून घेऊन योग्य वेळी योग्य दिशा द्यायची असते.”