शरीरातले ट्रॅफिक सिग्नल

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
03rd October, 10:34 pm
शरीरातले ट्रॅफिक सिग्नल

रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल नसतील तर काय होईल? गाड्या कुठल्याही वेळी धावतील आणि अपघात होऊ शकतात. म्हणून लाल, पिवळा आणि हिरवा सिग्नल्स आपल्याला योग्य वेळी थांबण्याची, सावध होण्याची आणि पुढे जाण्याची सूचना देतात. तुम्हाला माहीत आहे का? आपल्या शरीरातही असे अनेक छोटे-छोटे ट्रॅफिक सिग्नल असतात!

पोटात कुरकुर होऊन भूक लागणे हा शरीराचा सिग्नल आहे. 'मला अन्न हवे आहे', तहान लागणे म्हणजे 'मला पाणी हवे आहे.' डोळे जड होणे, जांभई येणे म्हणजे 'आता झोप आणि विश्रांती हवी.' थकवा जाणवणे म्हणजे 'थोडे थांबा, शरीराला आराम द्या. शौचाची इच्छा होणे म्हणजे 'शरीरात तयार झालेले अनावश्यक घटक बाहेर टाकायचे आहेत' हा देखील शरीराचा महत्त्वाचा सिग्नल आहे.

पण आपण या सिग्नलकडे लक्ष नाही दिले तर?

भूक नसतानाही सतत खात राहिलो तर पोट जड होऊ शकते आणि अपचन होऊ शकते. तहान लागूनही पाणी प्यायलो नाही तर शरीराला त्रास होऊ शकतो. झोप येत असतानाही मोबाईलवर खेळत राहिलो तर दुसऱ्या दिवशी थकवा आणि आळस जाणवू शकतो. शौचाची इच्छा वारंवार दाबत राहिलो तर बद्धकोष्ठतेसारख्या समस्या होऊ शकतात म्हणजेच शी घट्ट होते आणि ती शरीरातून बाहेर पडताना त्रास होतो, वेदना होतात.

रस्त्यावर जर सिग्नल तोडले गेले तर पोलीस दंडाची पावती देतो, पण शरीरातील सिग्नल तोडल्यावर पोलिस दंडाची पावती देत नाहीत; आपले शरीरच आपल्याला 'दंड' देते. कधी पोटदुखी, कधी थकवा, कधी अस्वस्थपणा अशा छोट्या तक्रारींच्या रूपात शरीर आपल्याला सांगते- 'मी दिलेला सिग्नल लक्षात ठेव.'

आयुर्वेद आपल्याला शरीराच्या नैसर्गिक संकेतांकडे लक्ष देण्याची सवय लावतो. म्हणून आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा -

“माझे शरीर मला आत्ता कोणता सिग्नल देत आहे?”

भूक? तहान? झोप? थकवा? की शौचाची इच्छा?

सिग्नल ओळखा, योग्य वेळी थांबा आणि शरीराची काळजी घ्या. कारण आपल्या शरीराचे सिग्नल समजून घेणारी मुलेच आपल्या आरोग्याची खरी ‘स्मार्ट ड्रायव्हर’ बनतात. आणि त्यामुळे त्यांचे शरीर निरोगी आणि मन आनंदी राहते.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य