मिटूने मिनूला सुरक्षित वाचवले

Story: छान छान गोष्ट |
26th September, 10:52 pm
मिटूने मिनूला सुरक्षित वाचवले

मुलांनो ऐका,

“मित्र-मैत्रिणी काय असतात, हे मित्र-मित्रांना सांगूच नये. खरं पाहता, तो प्रश्न नकोच. आधीच सर्वांना माहिती असते की मित्र-मैत्रीण म्हणजे काय. खरं आहे.”

अशा या मित्र-मैत्रिणींच्या आयुष्यात खूप सारे छोटे-मोठे प्रसंग घडतात. मग ते खुशीचे, दुःखाचे, आनंदाचे इत्यादी... होय ना! असाच एक प्रसंग आहे, ज्यात एका मित्राने आपल्या बरोबर घरी चाललेल्या मैत्रिणीला संकटातून सुरक्षितपणे बाहेर काढले, याबद्दलची ही गोष्ट आहे.

मिटू आणि मिनू हे जिवलग मित्र होते. ते रोज शाळेतून एकत्र घरी जात. वाटेत अभ्यासाच्या, शाळेच्या आणि गमती-जमतींच्या गोष्टी करत त्यांचा रस्ता कधी संपायचा, हे त्यांनाही कळायचं नाही.

त्या दिवशीही ते आपल्या नेहमीच्या वाटेने घरी चालले होते. दोघेही अभ्यासाच्या गप्पांमध्ये रंगले होते.

“मिनू, उद्या गणिताची चाचणी आहे ना?” मिटूने विचारले.

“हो रे! मी सगळी उदाहरणं सोडवलीत,” मिनू म्हणाली.

दोघे बोलत-बोलत पुढे जात होते. चालता चालता कधी मिटू पुढे जायचा, तर कधी मिनू थोडी मागे राहायची.

तेवढ्यात अचानक मागून आवाज आला,

“मिटूऽऽ! अरे मिटू, वाचव!”

आवाज ऐकताच मिटूने पटकन मागे पाहिले.

काही खट्याळ मुले मिनूला त्रास देत होती. तिची वाट अडवून ती मुले तिला घाबरवत होती. मिनू घाबरून ओरडत होती.

मिटूने क्षणभरही वेळ न घालवता मिनूकडे धाव घेतली; पण त्याने त्या मुलांशी भांडण करण्याऐवजी शांतपणे मिनूला आपल्या जवळ घेतले.

“मिनू, घाबरू नकोस. आपण इथून सुरक्षित ठिकाणी जाऊया,” तो म्हणाला.

त्याने तिचा हात धरला आणि दोघे जवळच्या दुकानाकडे गेले.

“काका, ही मुलं आम्हाला त्रास देत आहेत. कृपया आमच्यासोबत राहा,” मिटूने दुकानातील काकांना सांगितले.

काकांनी लगेच दोघांना दुकानात घेतले आणि त्यांच्या आई-वडिलांना फोन करण्यास मदत केली.

मिनू अजूनही घाबरलेली होती.

काका तिला समजावत म्हणाले,

“मिनू, तू खूप धाडसी आहेस. घाबरणं चुकीचं नाही. पण अशा वेळी एकटीने कुठेही जाऊ नये, त्या व्यक्तींशी वाद घालू नये आणि विश्वासू मोठ्या व्यक्तीकडे ताबडतोब मदत मागावी.”

मिटूनेही मान हलवली.

“हो काका. मीही हे लक्षात ठेवीन. मित्राला वाचवताना स्वतःची सुरक्षितताही महत्त्वाची आहे.”

थोड्याच वेळात मिनूचे आई-बाबा तिथे आले. त्यांनी दुकानातील काकांचे आभार मानले.

मिनूने मिटूकडे पाहत म्हटले,

“आज तू माझी मदत केलीस. पण मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे तू भांडला नाहीस. तू मला सुरक्षित ठिकाणी आणलंस आणि मोठ्यांची मदत घेतलीस.”

मिटू हसला.

“खरी मैत्री म्हणजे संकटात एकमेकांना धीर देणं आणि सुरक्षित ठेवणं!”

त्या दिवसापासून दोघांनी काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवले, एकटे किंवा निर्जन ठिकाणी जाणार नाही.

 अनोळखी व्यक्ती किंवा त्रास देणाऱ्या मुलांसोबत वाद घालणार नाही.

 अडचण आली तर सुरक्षित ठिकाणी जाऊन विश्वासू मोठ्या व्यक्तीला लगेच सांगणार.

 आणि मित्र-मैत्रिणी अडचणीत असतील तर त्यांना एकटे सोडणार नाही.

मुलांनो, लक्षात ठेवा,

धैर्य म्हणजे संकटात मारामारी करणे नव्हे; स्वतःची आणि मित्रांची सुरक्षितता जपत योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून मदत घेणे, हेच खरे धैर्य!

तात्पर्य : मैत्रीमध्ये काळजी, प्रसंगावधान आणि सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे. अडचणीच्या वेळी घाबरू नका, पण एकट्याने धोका पत्करू नका, विश्वासू मोठ्यांची मदत घ्या.