भीती वाटली की शरिरात काय होते?

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
31st October, 11:38 pm
भीती वाटली की  शरिरात काय होते?

रात्री अचानक एखादा आवाज आला, अंधाऱ्या खोलीत एकटे जायचे असले किंवा परीक्षेत कमी गुण मिळण्याची भीती वाटली, की तुमचे हृदय जोरात धडधडते का? हात-पाय थरथरतात? पोटात गोळा येतो? असे होत असेल, तर घाबरू नका. ही तुमच्या शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.

भीती वाटली की शरीरात काय होते?

आपल्या मेंदूमध्ये अमिग्डाला नावाचा एक भाग असतो. तो संभाव्य धोक्याची जाणीव करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. एखादी गोष्ट धोकादायक वाटली की मेंदू शरीराला सावध राहण्याचा संदेश देतो. त्यामुळे हृदयाची धडधड आणि श्वासाचा वेग वाढतो, घाम येतो आणि स्नायू ताणले जातात. शरीर संकटाचा सामना करण्यासाठी तयार होते.

म्हणजेच, भीती ही आपल्याला धोक्यापासून वाचवण्यासाठी शरीराने दिलेली एक सावधगिरीची सूचना आहे.

पण भीतीचा आरोग्यावर परिणाम होतो का?

थोड्या वेळासाठी वाटणारी भीती सामान्य आहे. त्याचा आपल्याला त्रास होत नाही. मात्र सतत भीती वाटत राहिली, तर झोप नीट न लागणे, भूक कमी होणे, पोट दुखणे, चिडचिड होणे किंवा अभ्यासात लक्ष न लागणे अशा समस्या उद्भवू शकतात. काही मुले भीतीमुळे नवीन गोष्टी करून पाहण्याचे किंवा मित्रांसोबत खेळण्याचेही टाळतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

मग भीतीवर मात कशी करायची?

भीती वाटली की सर्वप्रथम थोडे थांबा आणि हळूहळू श्वास घ्या. नाकाने श्वास आत घ्या आणि सावकाश बाहेर सोडा. मन शांत करण्यासाठी हे काही वेळा करा.

भीती वाटत असेल, तर स्तोत्रे आणि मंत्र म्हणण्याची सवय उपयोगी ठरते. रोज संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी आवडते स्तोत्र म्हणावे. 'श्रीराम जय राम जय जय राम', 'ॐ नमः शिवाय' किंवा ' श्री गणेशाय नम:' यांसारख्या मंत्रांचा शांतपणे जप केल्याने मन एकाग्र होण्यास आणि शांत वाटण्यास मदत होते.

हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष यांसारखी स्तोत्रे म्हणताना मानाची ताकद वाढते, ईश्वराची शक्ती आपल्याभोवती आहे हे जाणवते आणि त्यामुळे भिती नाहीशी होते. म्हणून एखादे स्तोत्र नक्की पाठ करा आणि रोज म्हणा. 

स्वतःला विचारा, “मला नेमकी कशाची भीती वाटतेय?” आपली भीती ओळखल्याने तिचा सामना करणे सोपे जाते. भीती वाटत असेल, तर आई-बाबा, शिक्षक यांच्याशी मोकळेपणाने बोला. अंधाराची किंवा नवीन गोष्टींची भीती वाटत असेल, तर विश्वासू व्यक्तीच्या मदतीने हळूहळू त्या परिस्थितीची सवय करून घ्या.

भीतीमुळे झोप, अभ्यास किंवा खेळण्यावर सतत परिणाम होत असेल, तर मोठ्यांची मदत घ्या आणि गरजेनुसार डॉक्टरांशी बोला.