नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या सणांची जणू रांग लागली आहे. आणि या सणांच्या निमित्ताने नवीन खरेदी, वेगवेगळे नैवेद्याचे आणि खाऊचे प्रकार , सजावट इत्यादि आणि त्यात खास म्हणजे रांगोळी.
दिवाळी असो वा दसरा, सणासुदीला घरासमोर सुंदर रांगोळी काढण्याची परंपरा आपल्याकडे आहे. रांगोळीमुळे अंगणाचे सौंदर्य वाढते आणि मनालाही आनंद मिळतो. पण तुम्हाला माहीत आहे का, रांगोळी काढण्याच्या या छानशा कृतीतून अनेक गोष्टी शिकता येतात?
रांगोळी काढताना आपण ठिपके जोडतो, नक्षी तयार करतो आणि रंग भरतो. हे करताना आपले लक्ष त्या कृतीवर केंद्रित होते. मनातील इतर विचार बाजूला ठेवून आपण एखादी सुंदर कलाकृती तयार करण्यात रमून जातो. स्वतःच्या कल्पनेतून नवी नक्षी तयार केल्याने नवीन कल्पना सुचण्यास मनाला चालना मिळते.
वेगवेगळ्या वस्तूंनी रांगोळी तुम्ही काढू शकता - रंगबिरंगी बाजारात मिळणारी रांगोळी, फुलांची - पानांची रांगोळी, कडधान्यांपासून काढलेले रांगोळी इत्यादि.
फुलांची रांगोळी
झेंडू, शेवंती, गुलाब आणि इतर फुलांच्या पाकळ्यांनी रांगोळी सजवायला किती मजा येते. फुलांचे वेगवेगळे रंग, पाकळ्यांचे व पानांचे विविध आकार आणि सुगंध यांमधून आपल्याला निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येते. फुलांच्या पाकळ्या निवडणे आणि त्यांची मांडणी करणे हा बोटांच्या हालचालींचा छान सरावही असतो. तुमच्या घराच्या आजूबाजूला उगवणाऱ्या वनस्पतींपासून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.
रंगांची रांगोळी
लाल, पिवळा, हिरवा, निळा अशा रंगांनी अंगणात सुंदर रांगोळी रोज काहीजणांच्या घरी काढली जाते. कोणता रंग कुठे भरायचा, कोणती नक्षी कशी दिसेल, याचा विचार करताना निरीक्षणशक्ती आणि कल्पकता वाढते. हे रंग वापरताना त्यात हानिकारक केमिकल्स नाहीत ना याची काळजी घ्यावी.
रंगांची पूड वापरताना धूळ उडणार नाही आणि ती डोळ्यांत किंवा तोंडात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. रांगोळी घालून झाली की हात स्वच्छ धुवावे.
कडधान्यांची रांगोळी
मूग, मसूर, हरभरा आणि तूर यांसारख्या कडधान्यांपासूनही सुंदर रांगोळी काढता येते. कडधान्यांचे वेगवेगळे रंग, आकार आणि पोत पाहताना आपल्याला त्यांची ओळख होते. त्यांच्या रंगानुसार वेगवेगळे गट बनवणे आणि नक्षी तयार करणे यात मजा असते. याच निमित्ताने आपल्या आहारात कडधान्यांचे महत्त्वही समजून घेता येते. रांगोळीसाठी वापरलेली धान्ये स्वच्छ धुवून, उन्हात सुकवून, नीट निवडून आहारात वापरू शकता.
रांगोळी काढताना आरोग्याची काळजी
रांगोळी काढण्यासाठी स्वच्छ जागा निवडावी. बराच वेळ खाली बसल्याने त्रास होत असल्यास मध्येच उठून थोडे चालावे. रांगोळीचे साहित्य जमिनीवर सांडून घसरायला होणार नाही, याची काळजी घ्यावी. रांगोळी पूर्ण झाल्यावर हात स्वच्छ धुवावेत.
मग या सणासुदीला तुम्ही कोणती रांगोळी काढणार आहात- फुलांची, रांगोळीच्या रंगांची की कडधान्यांची? आपल्या कल्पनाशक्तीने अंगण सजवा आणि रांगोळीच्या प्रत्येक रंगातून आनंद, एकाग्रता व कल्पकतेचा अनुभव घ्या.

वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य


