हिक्... हिक्... उचकी का लागते?

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
19th September, 10:31 pm
हिक्... हिक्... उचकी का लागते?

हिक्... हिक्... हिक्...

अरे, उचकी लागली? माझी कोणीतरी आठवण काढत असेल असं वाक्य तुम्ही ऐकलं आहे का?  तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की उचकी येते तरी का? खरंच कोणीतरी आठवण काढली की उचकी येते का???

चला, आज या 'हिक्...हिक्' मागचं कारण जाणून घेऊया.

उचकी म्हणजे काय?

आपल्या छातीखाली श्वासपटल किंवा डायफ्राम नावाचा एक महत्त्वाचा स्नायू असतो. आपण श्वास घेतो तेव्हा तो खाली सरकतो आणि फुफ्फुसांमध्ये हवा भरायला मदत करतो. श्वास सोडताना तो पुन्हा वर येतो.

पण कधी कधी हा स्नायू अचानक, आकुंचन पावतो. त्याच क्षणी घशातील स्वरयंत्राजवळची जागा पटकन बंद होते आणि आपल्या तोंडातून 'हिक्' असा आवाज बाहेर पडतो. यालाच उचकी म्हणतात. संस्कृत भाषेत उचकीला 'हिक्का' असे म्हटले जाते.

उचकी कशामुळे लागते?

खूप घाईघाईने किंवा जास्त प्रमाणात खाणे, खाताना किंवा हसताना हवा गिळली जाणे, अचानक खूप गरम किंवा थंड पदार्थ घेणे, फिजी ज्यात बुडबुडे येतात अशी पेये पिणे, अति तिखट पदार्थ खाणे यामुळे उचकी लागू शकते.

कधी कधी खूप हसणे, उत्साह, भीती यामुळेही उचकी सुरू होऊ शकते.

उचकी लागली तर काय करायचे?

घाबरायचे नाही. बहुतेक वेळा उचकी काही मिनिटांत आपणहून थांबते. उचकी लागल्यावर हळूहळू गरम पाणी प्यावे, हळूवार श्वास घ्यावा आणि काही वेळ शांत रहावे. 

उचकी काही तास सतत सुरू राहिली किंवा वारंवार उचकी लागत  असेल किंवा त्यासोबत श्वास घेण्यास त्रास, उलटी, छातीत दुखणे असे त्रास होत असल्यास लगेच आई-बाबांना किंवा शिक्षकांना सांगून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घाईघाईने न खाता, प्रत्येक घास नीट चावून खा. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या सिग्नल्स कडे लक्ष द्या, कारण आपल्या शरीरात घडणारी प्रत्येक छोटी गोष्ट आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल काहीतरी सांगत असते.

पुढच्या वेळी अचानक 'हिक्... हिक्...' सुरू झालं, तर कोणीतरी आपली आठवण काढतेय असं समजून हसायला हरकत नाही.  पण आता तुम्हाला त्या 'हिक् हिक्' मागचं विज्ञानही माहिती आहे.