तुमच्या घश्यात दोन्ही बाजूला दोन छोट्या गाठी असतात. त्यांना टॉन्सिल्स म्हणतात. हे आपल्या शरीराचे पहारेकरी आहेत. नाकातोंडातून आत येणाऱ्या जंतूंना ते दारातच अडवतात.
पण कधी कधी जंतूंशी लढताना हे सैनिक दमतात आणि सुजतात. मग घसा दुखतो, गिळताना त्रास होतो, ताप येतो आणि आवाजही बसतो.
टॉन्सिल्स केव्हा सुजतात?
१.खूप आईस्क्रीम, थंड पेये आणि फ्रिजमधले थंड पदार्थ खाल्ल्याने
२. तळलेले पदार्थ, आंबट पदार्थ जास्त खाल्ल्याने
३. पावसात भिजल्याने किंवा थंड हवेत फिरल्याने
४. दिवसा जास्त झोपल्याने
घसा दुखला तर काय कराल?
१. लगेच आई-बाबांना किंवा शिक्षकांना सांगा. लपवू नका.
२. मोठ्यांच्या मदतीने कोमट पाण्याच्या गुळण्या करा.
३. ताजे आणि गरम जेवण जेवा.
४. तहान लागली असता कोमट पाणी प्या.
६. औषध कधीही स्वतःच्या मनाने घेऊ नका.
टॉन्सिल्स सुजले असता काय काळजी घ्यावी?
१.आईस्क्रीम आणि थंड पेये रोज नको. घसा दुखत असेल तर अजिबात नको.
२.पाऊस किंवा थंडीत घसा आणि छाती झाकून उबदार राहा.
३. तुमचा रुमाल, टॉवेल, पाण्याची बाटली आणि डबा इतरांशी अदलाबदल करू नका.
४. घरचे ताजे, गरम अन्न खा.
वैद्यांकडे कधी जायचे?
खूप ताप आला, पाणी गिळणेही अवघड झाले, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला किंवा वारंवार घसा दुखू लागला, तर आई-बाबांना सांगा आणि जवळच्या वैद्यांकडे जा. ते तुमचा घसा तपासून योग्य औषध देतील.तुम्ही तुमच्या घशातल्या सैनिकांची काळजी घेतली, तर तेही तुमचे आजारांपासून रक्षण करतील.



