अाजी... आजी... खूप झालं ना गं! मी बसते बाबांपाशी. तू थोडा आराम कर."
परीने आजीच्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला आणि तिला खुर्चीवर बसवले.
आजी थकलेल्या आवाजात म्हणाली, "अगं, परी किती वेळ झाला माहिती आहे? चल, तू थोडा आराम कर."
परी हसत म्हणाली, "अगं आजी, मी करेन. तू बघ, तू काही खाल्लंसुद्धा नाहीस. तू आमचा आधार आहेस. तूच अशी थकलीस तर आम्ही कोणाकडे पाहायचं?"
आजीने बाबांकडे पाहिले. बाबा पलंगावर निपचित पडले होते. डोळे मिटलेले. औषधांच्या वेळा, डॉक्टरांच्या सूचना आणि सततची काळजी... या सगळ्यामुळे घरातील वातावरणच बदलून गेले होते.
आजीच्या डोळ्यांत पाणी आले. "परी... बाबा असे निपचित पडले आहेत. आजारी आहेत. माझा मुलगा असा असताना मी कशी गं खाऊ आणि खुश राहू?"
परीने आजीचा हात हातात घेतला. "हो आजी, कळतं मला. तरी तू स्वतःची काळजी घेतली पाहिजेस."
क्षणभर शांतता पसरली. बाहेरून मात्र अचानक मोठा आवाज आला, धडाम्... धडाम्... धडाम्! परी दचकली. आजीने कानावर हात ठेवले. "अगं, अजून चतुर्थी सुरूही झाली नाही, तरी हा आवाज!"
परी खिडकीजवळ गेली. रस्त्यावर काही तरुण गणपतीच्या मंडपाची तयारी करत होते. मोठमोठे स्पीकर लावून त्यांची चाचणी सुरू होती.
आजी हळू आवाजात म्हणाली, "परी, एक काम करशील?"
"काय गं आजी?"
"या वर्षी चतुर्थीला हे मोठमोठे आवाज नकोत म्हणून लोकांमध्ये थोडा प्रसार करशील? काय म्हणतात त्याला... अॅडव्हर्टायझिंग?"
परीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. "हो आजी! चतुर्थी परवा आहे. या डीजेच्या आवाजामुळे बाबांनी अंथरुण धरले आहे, हे मी कसे विसरू?"
आजीने दीर्घ श्वास घेतला. "हो बाळा. तुमचा मोठा आधार असा झोपला आहे. चतुर्थी आली की हा आवाज आणखी वाढतो. बाबांना तो अजिबात सहन होत नाही. ते आधीच आजारी आहेत. आवाज झाला की त्यांना बेचैनी होते, डोके दुखते... आणि आपण आय बिचारी किती कष्ट करणार?" ती थोडी थांबली. "तुम्ही अजून मोठेही झालेले नाहीत. तू तर आता आमचा आधार होशील ना? तुझे शिक्षणही आहे..."
परीने आजीला मध्येच थांबवत म्हटले, "आजी, शिक्षण फक्त पुस्तकात नसतं. आपण जे शिकतो ते आपल्या आयुष्यात वापरायचं असतं ना?"
आजीने तिच्याकडे पाहिले. "मग काय करणार आहेस?"
परीच्या डोळ्यांत चमक आली. "सगळ्यांना विनंती करणार. गणपती बाप्पा म्हणजे आनंद, भक्ती आणि एकत्र येण्याचा उत्सव. मग त्या आनंदासाठी दुसऱ्याला त्रास का द्यायचा?"
दुसऱ्या दिवशी परीने तिच्या मित्रमैत्रिणींना एकत्र केले. तिने एक छोटा संदेश तयार केला, ‘बाप्पांचे स्वागत मनापासून करूया, पण आवाजाने नाही. गणपती बाप्पा मोरया! ध्वनीप्रदूषण दूर करूया!’
मुलांनी छोट्या फलकांवर संदेश लिहिले. कुणी लिहिले, ‘बाप्पांना आरती आवडते, कर्णकर्कश आवाज नाही!’ कुणी लिहिले, ‘उत्सव आपला, त्रास कुणाला नको!’
परीने हा संदेश मंडळातील मोठ्या व्यक्तींनाही सांगितला. सुरुवातीला काही जण म्हणाले, "अगं, वर्षातून एकदाच तर उत्सव येतो!"
परी शांतपणे म्हणाली, "हो काका, उत्सव वर्षातून एकदाच येतो. पण आजारी माणसाला होणारा त्रास त्या एका दिवसापुरता राहत नाही. आपण आवाज थोडा कमी केला तर आपला उत्सव कमी होणार नाही; उलट दुसऱ्याचाही आनंद वाढेल."
तिच्या बोलण्यात राग नव्हता, फक्त आपलेपणा होता. मंडळातील एका काकांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. "बरोबर आहेस गं. यंदा आपण आवाजाची मर्यादा पाळूया." हळूहळू इतरांनीही तिचे म्हणणे मान्य केले.
चतुर्थीच्या दिवशी मंडपात आरती झाली. ढोल-ताशांचा उत्साह होता, पण कर्णकर्कश आवाज नव्हता. मंडपाजवळ सूचना लावण्यात आल्या होत्या, "उत्सव साजरा करा, पण आजूबाजूच्यांची काळजी घेऊन."
घरी बाबा शांत झोपले होते. परी खिडकीतून बाहेर पाहत हसली. आजी तिच्या शेजारी येऊन उभी राहिली.
"परी, आज मला वाटतं तू खरोखर मोठी झालीस."
परी हसून म्हणाली, "नाही गं आजी... मी फक्त बाबांना थोडा शांत श्वास घेता यावा म्हणून एवढंच केलं."
आजीच्या डोळ्यांत पाणी आले. तिने परीला जवळ घेतले. बाहेरून मंद आवाजात आरतीचे सूर ऐकू येत होते आणि त्या शांत वातावरणात परीला जणू बाप्पांचाच आशीर्वाद ऐकू आला, "जिथे दुसऱ्याच्या सुखाचा विचार असतो, तिथेच खरा उत्सव असतो."
बोध: उत्सव आनंदाने साजरा करावा; पण आपल्या आनंदामुळे आजारी, वृद्ध, लहान मुले किंवा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. भक्ती मनात असते, कर्णकर्कश आवाजात नाही.



