करंजी बाप्पाचा गोड नैवेद्य

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
12th September, 11:00 pm
करंजी  बाप्पाचा गोड नैवेद्य

सोन पावलांनी आले बाप्पा

शेंदूर मस्तकी लावून टिळा

माझा बाप्पा किती गोड दिसतो

माझा मोरया किती गोड दिसतो...

मंगलमूर्ती गणरायाचं आनंदाने स्वागत करण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात ना??? गणपतीसाठी नैसर्गिक सजावट, मकर , सुंदर आसन, माटोळी या सगळ्या गोष्टी करण्यात तुम्ही मग्न असाल. आणि गणरायाला प्रिय असलेले पदार्थ लाडू आणि करंज्या सुद्धा केल्या असतील. बाप्पाच्या नैवेद्यात मोदकांबरोबर करंजीलाही खास स्थान आहे. पण मित्रांनो, ही गोड करंजी फक्त चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

करंजीच्या सारणासाठी वापरले जाणारे नारळ, खोबरे, गूळ आणि सुकामेवा हे सर्व पदार्थ पौष्टिक असतात. सुकं खोबरं शरीराला ऊर्जा आणि स्निग्धता देतं, तर गूळ रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करतो आणि लघवी साफ होण्यास सुद्धा उपयुक्त आहे . वेलची व जायफळासारखे मसाले पचनक्रिया सुधारतात आणि पदार्थ पचायला हलका करतात. सण-उत्सवात गोड पदार्थ बनवताना त्यात आरोग्याचाही विचार केला जातो. करंजीत वाटाण्याची पिठी आणि गूळ, जायफळ घालून सुद्धा सारण वापरले जाते, हे सुद्धा चविष्ट आणि पौष्टिक असते. ज्यांना गोड करंजी आवडत नाही त्यांच्यासाठी खास खोबऱ्याचं तिखट सारण केलं जातं आणि त्यात मधेच किंचित गोडवा यावा यासाठी मनुका घातल्या जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या करंज्याचा नैवेद्य गणरायाला अर्पण करतात. 

गणेश चतुर्थी हा सण फक्त गोडधोड खाण्यासाठी नसतो, तर तो आपल्याला एकत्र येण्याची, स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देण्याची आणि आपल्या परंपरा जपण्याची शिकवण देतो. श्री गणेशाची आरती म्हणताना, मोदक-करंजी वाटताना जो आनंद मिळतो, त्यातून आपले मनही प्रसन्न होते. आनंदी मन हे आपल्या शरीरासाठीही तितकेच महत्त्वाचे असते.

करंजी हा तळलेला पदार्थ आहे. त्यामुळे करंजी खाताना एक गोष्ट लक्षात ठेवा, करंजी आवडते म्हणून एकावेळी खूप जास्त खाऊ नका. योग्य प्रमाणात खाल्लेली करंजी शरीराला त्रास न देता आनंदही देते आणि ऊर्जाही.  तसेच करंजी खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने खेळा किंवा फिरा, यामुळे पचनही चांगले होईल.

यंदाच्या गणेश चतुर्थीला घरच्यांबरोबर करंजी करण्याचा आनंद घ्या, गणपतीला नैवेद्य अर्पण करा आणि आनंदाने सण साजरा करा. आरोग्य आणि आनंद यांची सांगड घालणारा हा सण आपण सर्वांनी मिळून साजरा करूया.

मंगलमूर्ती मोरया!