Home >> हुप्पा हुय्या >> दार बंद झाले अन्...

दार बंद झाले अन्...

Story: छान छान गोष्ट |
18th July, 11:00 pm
दार बंद झाले अन्...

ती आपल्या लहानग्या बाळाबरोबर घरात एकटीच होती. बाबा कामावर गेले होते. घरातील रोजची कामे सुरू होती. बाळ फरशीवर बसून रंगीबेरंगी खेळण्यांशी खेळत होते, तर आई त्याच्याकडे अधूनमधून पाहत काम करत होती. बाळाला क्षणभरही नजरेआड करणे तिला आवडत नव्हते.

तेवढ्यात शेजारचा राम आला. राम सहा वर्षांचा होता. वयाने लहान असला तरी स्वभावाने समजूतदार होता. तो रोज त्यांच्या घरी यायचा. बाळाबरोबर खेळायचा, काकूशी गप्पा मारायचा.

"राम, जरा बाळाकडे लक्ष ठेवशील का? मी पटकन खाऊ बनवते," काकूंनी विचारले.

"हो काकू!" राम हसत म्हणाला.

काकूंनी एका बाजूला दूध गरम करायला ठेवले, तर दुसऱ्या बाजूला भाजी चढवली. बाळ आणि राम स्वयंपाकघराच्या फरशीवर बसून खेळत होते.

इतक्यात दाराची बेल वाजली.

"कोण आले असेल?" म्हणत त्या बाहेर गेल्या.

आणि...

धाडकन्!

स्वयंपाकघराचे दार आपोआप बंद झाले.

काकूंनी दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते आतून बंद झाले होते. त्यांचे हृदय जोरात धडधडू लागले. आत बाळ आणि राम होते.

त्या घाबरल्या; पण त्यांनी स्वतःला सावरले.

"राम... ऐकू येतंय का?" त्यांनी मोठ्याने हाक मारली.

"हो काकू!" आतून आवाज आला.

"घाबरायचं नाही. बाळाजवळच राहा."

रामने बाळाला आपल्या जवळ घेतले. बाळही शांत झाले.

काकूंना आठवले की राम रोज त्यांच्या घरी येत असल्यामुळे घरातील प्रत्येक गोष्ट त्याने पाहिली होती.

त्या म्हणाल्या, "राम, जेवणाच्या टेबलाजवळची खुर्ची हळूहळू दाराजवळ आण. मग वर चढून कडीपर्यंत हात पोहोचतो का बघ."

रामने धीर सोडला नाही. त्याने लहानशा हातांनी खुर्ची ओढली. थोडी दमछाक झाली, पण तो थांबला नाही. खुर्चीवर चढला आणि कडीपर्यंत हात पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागला.

पहिल्या प्रयत्नात जमले नाही.

दुसऱ्या प्रयत्नातही नाही.

पण तिसऱ्या प्रयत्नात...

टक!

कडी सरकली.

दार हळूहळू उघडले.

काकूंनी धावत आत जाऊन बाळाला उचलले आणि रामला घट्ट मिठी मारली.

"शाब्बास, राम! तू आज खूप मोठं काम केलंस."

राम लाजत हसला.

तेवढ्यात बेल वाजवणारे शेजारीही आत आले. त्यांनी घडलेला प्रकार ऐकला आणि रामच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

त्या दिवसानंतर काकूंनी घरातील दारे, कुलपे आणि सुरक्षिततेची पुन्हा एकदा तपासणी केली. रामलाही त्यांनी एक छोटी भेट दिली.

त्या दिवशी सर्वांना एक गोष्ट समजली,

वयाने लहान असलो तरी प्रसंगावधान, धैर्य आणि शांत विचार मोठे काम करून जातात.

बोध :  संकटाच्या वेळी घाबरून न जाता शांत राहून मोठ्यांच्या सूचनांचे पालन करावे. प्रसंगावधान हेच खरे धैर्य असते.


सोनाली सु. पेडणेकर