सोशल मीडियावर ‘रेट्रो ट्रेण्ड’चा धुमाकूळ

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
16 mins ago
सोशल मीडियावर ‘रेट्रो ट्रेण्ड’चा धुमाकूळ

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर ८० च्या दशकातील नॉस्टॅल्जिया म्हणजेच जुन्या आठवणींना उजाळा देणारा ‘रेट्रो ट्रेण्ड’ प्रचंड व्हायरल होत आहे. या सोशल मीडियाच्या वाऱ्यात आता राजकीय दिग्गजही सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, पियुष गोयल, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबतच मुख्यमंत्री डॉ. प्रमोत सावंत यांनी या ट्रेण्डमध्ये सहभाग घेत आपले ८० च्या दशकातील लूक सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या व्हायरल ट्रेण्डचा आनंद घेत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एका क्लासिक १९८० च्या बॉलीवूड स्टाइलमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते सनग्लासेस, ब्लेझर, ओपन शर्ट आणि कारजवळ रेट्रो स्टाइल पोझ देताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, सर्वजण पुन्हा ८० च्या दशकात का जात आहेत? मलाही ८० च्या दशकाच्या नॉस्टॅल्जियामध्ये जाणे भाग पडले!
या मालिकेत पुढे जात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही एका खड्या विंटेज-स्टाईल फोटोनिशी या ट्रेण्डमध्ये सहभाग घेतला. सनग्लासेस आणि सूट परिधान केलेल्या या विंटेज लूकमधील फोटो शेअर करत त्यांनी '८० च्या दशकातील ट्रेंडचा आनंद घेताना' असे कॅप्शन दिले आहे.
तसेच, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही मागे न राहता एक रेट्रो छायाचित्र शेअर केले आहे. मोठ्या आकाराचे सनग्लासेस आणि त्या काळातील फॅशननुसार पेहराव केलेल्या या फोटोसोबत त्यांनी, नॉस्टॅल्जिया जोडलेल्या कोणत्याही ट्रेण्डमध्ये सामील होत आहे. ८० च्या दशकात परतलो, अहा! अशी मजेशीर कमेंट केली आहे.
तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही १९८० च्या बॉलीवूड स्टाइलमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते लेदर जॅकेट, पांढरा शर्ट आणि कारजवळ रेट्रो स्टाइल पोझ देताना दिसत आहेत. त्यांनी ‘८० च्या दशकात परतताना, जिथे शैली आणि बाणा होता.’ अशी कॅप्शन दिली आहे.
हा ट्रेण्ड पूर्णपणे १९८० च्या दशकातील विशिष्ट फॅशन, संगीत, चित्रपट आणि पॉप-कल्चरपासून प्रेरित आहे. लोक या दशकातील आठवणींना उजाळा देण्यासाठी जुने फोटो किंवा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे रेट्रो स्टाइलमधील फोटो तयार करत आहेत आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. सध्या इंटरनेटवर हा ट्रेण्ड युजर्सचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.