क कानाचा

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
22nd August, 10:40 pm
क कानाचा

आपल्या सुंदर शरीरातील वेगवेगळे अवयव आपापली कामं व्यवस्थित करतात त्यामुळे आपण वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. या सर्व अवयवांपैकी महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले कान. कानांमुळे आपल्याला विविध गोष्टींचं ज्ञान मिळतं म्हणून कानाला ज्ञानेंद्रिय म्हटले आहे. ऐकण्यापासून ते शरीराचे संतूलन राखण्यापर्यंत कामं आपले कान करतात. कानाचे एकूण ३ भाग आहेत - बाहेरचा , मधला आणि आतला भाग. बाहेरच्या व मधल्या भागामध्ये कानाला एक पडदा असतो. जो आतल्या भागाचं रक्षण करतो. कानाची नीट काळजी रोज घ्यायला हवी.

पावसाळ्यात किंवा पोहून आल्यावर कान दुखू लागतात, कानांमध्ये खाज येते किंवा कानातून पाणी येते. 

पाऊस आणि पोहण्यामुळे होणाऱ्या कानांच्या तक्रारी टाळण्यासाठी काय करावे?

पावसाळ्यात भिजल्यास किंवा पोहताना कानात पाणी जाते. कानाच्या बाहेरील नलिकेत ओलावा बराच वेळ राहिला, तर तेथे जंतूंच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होऊ शकते. त्यासाठी पुढील गोष्टी कराव्या. 

१. पोहून किंवा पावसात भिजल्यानंतर कानाचा बाहेरील भाग मऊ टॉवेलने अलगद कोरडा करावा. डोके एका बाजूला झुकवून कानात साचलेले पाणी नैसर्गिकरित्या बाहेर येऊ द्यावे. स्वच्छ, कोरड्या मऊ कापडाने बाहेरील भाग हलक्या हाताने पुसावा.

२. कानात कॉटन इयर बड, पिन, माचिसची काडी किंवा इतर वस्तू घालू नयेत. यामुळे कानाच्या त्वचेला इजा होऊन संसर्ग वाढू शकतो आणि कानातील नैसर्गिक संरक्षण करणारं वॅक्स निघून जातं. 

३. पावसात भिजल्यानंतर डोके व कान लगेच कोरडे करावेत. ओले केस, ओले कान घेऊन बराच वेळ राहू देऊ नये.

४. या ऋतूत थंड पदार्थ, आइसक्रीम, कोल्ड्रिंक्स टाळावेत. गरम सूप, आले-तुळस काढा यांचा आहारात समावेश करावा.

५. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जाहिराती पाहून कानात कोणतेही औषध टाकू नये.

पुढील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या:

सतत कान दुखणे, ताप, कानातून पू किंवा दुर्गंधीयुक्त स्त्राव आढळल्यास घरगुती उपाय करू नका, त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

थोडी काळजी आणि योग्य सवयींनी तुमचे कान पावसाळ्यातही सुरक्षित ठेवता येतात.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य