
एका छोट्याशा गावाच्या बाहेर एक घर होते. घराभोवती हिरवीगार झाडे, एक छोटी पायवाट आणि शांत वातावरण होते. वस्ती थोडी दूर असल्यामुळे तिथे फारशी वर्दळ नसायची.
त्या घरात आई, बाबा आणि त्यांची दोन मुले राहत होती. मुलांचे वय दहा-अकरा वर्षांच्या आसपास होते. बाबा एका कारखान्यात काम करायचे. त्यांची रात्रपाळी असायची. आई घर सांभाळण्याबरोबरच ऑनलाइन माध्यमातून थोडेफार काम करून संसाराला हातभार लावायची.
बाबा कामावर गेले की आई घराचे दरवाजे आणि खिडक्या नीट बंद करून घ्यायची. ती मुलांना नेहमी एक गोष्ट शिकवायची.
"कधीही संकट आले, तर घाबरायचे नाही. शांत राहून योग्य निर्णय घ्यायचा."
त्यांनी एक पोपटही पाळला होता. त्याचे नाव होते मिटू. मिटू खूप हुशार होता. मुलांनी त्याला अनेक शब्द शिकवले होते. "चोर आला!", "मदत करा!", "उठा! उठा!" असे संकेतही तो बोलू शकत होता.
एके दिवशी आई गावातील बाजारात गेली. एका नातलगाच्या लग्नासाठी तिने थोडे सोन्याचे दागिने विकत घेतले. आई खरेदी करत असताना दूर उभा असलेला एक चोर तिच्याकडे लक्ष ठेवून होता. त्याने सोन्याची खरेदी पाहिली आणि घर कुठे आहे हेही गुपचूप शोधून काढले.
काही दिवस तो संधीची वाट पाहत राहिला. त्याला कळले की बाबांची रात्रपाळी असते. मग त्याने चोरीची योजना आखली.
त्या रात्री बाबा कामावर गेले होते. आई आणि दोन्ही मुले घरात होती. जेवण झाल्यावर सर्वजण झोपले. बाहेर काळोख पसरला होता.
मध्यरात्री चोर हळूच घराजवळ आला. त्याने खिडकीची कडी उघडण्याचा प्रयत्न केला. किर्र आवाज झाला.
मिटूचा डोळा उघडला.
त्याने खिडकीजवळ एक सावली पाहिली.
क्षणाचाही विलंब न करता तो मोठ्याने ओरडू लागला,
"चोर आला! चोर आला! उठा! उठा!"
मिटूचा आवाज ऐकून मुलांना जाग आली. आईने मुलांना दिलेले शिक्षण त्यांना आठवले. घाबरण्याऐवजी त्यांनी शांतपणे विचार केला.
मोठ्या मुलाने लगेच घरातील सायरनसारखा अलार्म सुरू केला. लहान मुलाने फोन हातात घेतला आणि शेजारी राहणाऱ्या काकांना संपर्क केला.
दरम्यान, मिटू सतत ओरडत होता,
"मदत करा! चोर आला! मदत करा!"
अचानक घरातून आवाज येऊ लागल्याने चोर घाबरला. तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण तोपर्यंत शेजारी काका आणि काही गावकरी काठ्या घेऊन तेथे पोहोचले होते.
चोराला पळण्याची संधीच मिळाली नाही. गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
सकाळी सर्वजण मिटूचे आणि मुलांचे कौतुक करू लागले.
आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
ती म्हणाली, "धैर्य, योग्य शिक्षण आणि प्रसंगावधान यांच्यामुळेच आपण संकटातून वाचलो."
मिटू आपल्या पिंजऱ्यात बसून मान हलवत होता. जणू काही तोही आपले कौतुक ऐकत होता.
त्या दिवसानंतर गावभर त्या हुशार पोपटाची आणि धाडसी मुलांची चर्चा झाली.
बोध : संकटाच्या वेळी घाबरण्यापेक्षा शांत राहून योग्य कृती करणे महत्त्वाचे असते. तसेच प्राणी-पक्ष्यांवर प्रेम केल्यास तेही आपल्या कुटुंबाचे विश्वासू साथीदार बनतात.
सोनाली सु. पेडणेकर