शाळेची घंटा वाजणार!!!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
30th May, 11:10 pm
शाळेची घंटा वाजणार!!!

उन्हाळी सुट्ट्या म्हणजे मजा, खेळ, आजोळ आणि मित्र मैत्रिणींसोबत धमाल. पण आता सुट्ट्या संपत आल्या आहेत आणि शाळा सुरू होणार आहे. तुमच्या पैकी बऱ्याच जणांच्या मनात  'आता सुट्टी संपली, परत अभ्यास... परत शाळा... नको वाटतं' असा विचार येऊन गेला असेल.

हे अगदी साहजिक आहे. पण पुन्हा शाळेत जाण्यासाठी फक्त दप्तर तयार करणं पुरेसं नाही, मन पण तयार करावं लागतं.

सुट्टीनंतर मन असं का होतं?

सुट्टीत आपण मनाला हवं तेव्हा उठायचो, हवं ते करायचो, सकाळी उशीरापर्यंत झोपायचो. मेंदूला त्याची सवय झालेली असते. शाळा सुरू झाली की अचानक वेळापत्रक बदलतं आणि मेंदू थोडा गोंधळतो. यामुळे पुढील गोष्टी होतात.

१. शाळेत जाण्याची इच्छा नसते

२. पोटात दुखू लागते

३. रात्री झोप लागत नाही

४. आपण आजारी आहोत असे वाटते

शाळेत जायला मन तयार करण्यासाठी फक्त सुट्टीत लागलेल्या सवयी बदलल्या की झालं काम.

मन कसं तयार करायचं?

१. हळूहळू वेळ बदला

शाळा सुरू होण्याच्या आठ-दहा दिवस आधीपासून झोपण्याची आणि उठण्याची वेळ हळूहळू शाळेच्या वेळेनुसार बदलायला सुरुवात करा. एकदम बदल नको, रोज १५-२० मिनिटे आधी उठा.

२. स्वतःशी बोला

स्वतःला विचारा , शाळेत काय चांगलं आहे? उत्तर मिळेल शाळेत मित्र मैत्रिणी भेटतील, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेता येईल, नवीन काहीतरी शिकायला मिळेल या गोष्टींचा विचार करा.

४. प्राणायाम करा , फक्त ५ मिनिटे

सकाळी उठल्यावर अनुलोम-विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम करा. मन शांत होतं, एकाग्रता वाढते. शाळेत लक्ष लागायला मदत होते.

५. आई-बाबांशी बोला

जर मनात भीती असेल, नवीन वर्ग, नवीन शिक्षक, परीक्षा इत्यादींविषयी तर ते मनात ठेवू नका. आई-बाबांना सांगा. मन मोकळं केलं की हलकं वाटतं. आणि भिती नाहीशी होते.

आणि शाळा म्हणजे फक्त अभ्यास नाही तर शाळेत नवनवीन मित्र मैत्रिणी भेटतात , चांगले शिक्षक असतात, खेळ खेळता येतात, नवीन ज्ञान मिळवण्याची संधी या सगळ्या गोष्टी मिळतात. मन तयार असलं की शाळेचा पहिला दिवस तुम्ही एन्जॉय कराल. 

चला तर मग दप्तर आणि मानाची तयारी सुरू करा.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य