उन्हाळ्यातील जादुई मित्र लिंबू!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
09th May, 10:43 pm
उन्हाळ्यातील  जादुई मित्र लिंबू!

उन्हाळा आला की सूर्य अगदी आग ओकायला लागतो. बाहेर खेळून आल्यावर घामाने अंग चिंब होते, घसा कोरडा पडतो आणि शरीर थकल्यासारखं वाटतं. अशा वेळी आई जर थंडगार लिंबूपाणी घेऊन आली, तर पहिला घोट घेताच थंड वाटतं. 

लिंबू चवीला आंबट असलं तरी ते शरीराला ताजेतवाने ठेवण्याचं काम करतं. त्यामुळे जास्त उष्णतेमुळे होणारी बेचैनी, थकवा आणि तोंड कोरडे पडणे कमी होते. लिंबू खूप गुणकारी असलं तरी ते योग्य प्रमाणातच घ्यायला हवं.

लिंबूसरबत का प्यावे?

खेळून आल्यावर किंवा उन्हातून घरी आल्यानंतर लिंबूपाणी प्यायल्याने 

 लगेच ताजेतवाने वाटते

 घामामुळे कमी झालेले पाणी भरून निघते. 

 पचन सुधारते. 

 उष्णतेमुळे होणारा थकवा कमी होतो. 

लिंबू वापरताना काय लक्षात ठेवावे?

 आंबट पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करू नये, त्यामुळे एकावेळी जास्त प्रमाणात लिंबू सरबत पिऊ नका. 

 रिकाम्या पोटी जास्त लिंबूपाणी पिऊ नये

 थंडगार बर्फ टाकून रोज पिण्यापेक्षा साधं किंवा मातीच्या भांड्यातलं पाणी वापरावं.

आईसोबत तुम्ही एक ‘समर ड्रिंक’ बनवू शकता:

अर्ध्या लिंबाचा रस एका ग्लास मधे घ्या, त्यात चिमूटभर मीठ घालून ढवळा, एक ग्लास माठातले पाणी, चवीपुरती साखर आणि चिमूटभर जिरेपूड घालून ढवळा. झालं तयार 'सुपर समर ड्रिंक'

या उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्सपेक्षा नैसर्गिक लिंबूपाणी प्या आणि थंड रहा.


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य