नखांमध्ये दडलेत आरोग्याचे शत्रू!!!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
25th April, 11:09 pm
नखांमध्ये दडलेत आरोग्याचे शत्रू!!!

अभ्यास करताना, टीव्ही पाहताना किंवा कधीकधी नुसतंच बसले असताना आपोआप हात तोंडाकडे जातो आणि नकळत नखं कुरतडली जातात. नकळत ही सवय लागली असली, तरी शरीरासाठी ही सवय त्रासदायक आहे. तुम्हालाही हे माहीत आहे, पण बऱ्याचदा पटकन लक्षात येत नाही.

​वाढलेल्या नखांमध्ये आपल्या आरोग्याचे शत्रू लपलेले असतात. आपण दिवसभर अनेक गोष्टींना हाताने स्पर्श करतो; घराच्या किंवा टॉयलेटच्या दरवाजाची कडी, पाण्याचा नळ, शाळेतले बाक, पुस्तकं इत्यादी. या सगळ्या ठिकाणी असणारे जंतू आणि विषाणू नखांखाली जमा होतात. जेव्हा आपण नखं तोंडात घालतो, तेव्हा हे सगळे जंतू आणि विषाणू पोटात जातात.

​सारखी नखं कुरतडल्याने काय होऊ शकतं?

नखं कुरतडण्यामुळे पोटदुखी, उलट्या आणि जंत होण्याची शक्यता वाढते. याशिवाय नखांची वाढ नीट होत नाही, नखांभोवती जखमा होतात आणि कधीकधी संसर्ग होऊन नखं काळी पडतात किंवा बोटं सुजतात.

​अनेकदा चिंता वाढली, भीती वाटली किंवा कंटाळा आला असता काहीजण नखं कुरतडतात. पण नंतर याचे दुष्परिणाम सोसावे लागतात. भीती वाटली किंवा चिंता वाढली की आई-बाबांशी, मित्र-मैत्रिणींशी बोला; ते तुमची चिंता आणि भीती कमी करायला मदत करतील. मन मोकळं केल्यावर ही सवय आपोआप कमी होते.

​सवय मोडायची कशी?

१. नखं नेहमी कापून ठेवा. छोटी नखं कुरतडण्याचा मोह कमी होतो.

२. हात तोंडाकडे जात आहे हे लक्षात येताच मूठ बंद करा आणि एखादा खेळ खेळा किंवा एखादं काम करा.

३. घरी आईला किंवा आजीला ही सवय मोडण्यासाठी मदत करायला सांगा, त्या तुम्हाला याची आठवण करून देतील.

​लहान वयात ही सवय मोडली तर आरोग्य चांगलं राहील; नाहीतर मोठे झाल्यावर सुद्धा ही सवय तशीच राहील, आरोग्य बिघडेल आणि बघणारे कदाचित चिडवतील. कोणी चिडवलं की आपल्याला वाईट वाटतं ना? मग मन दुःखी होतं. त्यामुळे वाईट सवयी लहानपणीच सोडल्या, तर तुम्ही आनंदी आणि निरोगी राहाल.


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य