सत्तरी तालुक्यात पाणीटंचाईचे संकट झाले अधिक गहिरे; ११ गाव टँकरवर अवलंबून

नियोजनाच्या अभावामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
सत्तरी तालुक्यात पाणीटंचाईचे संकट झाले अधिक गहिरे; ११ गाव टँकरवर अवलंबून

वाळपई: राज्यात तापमानाचा पारा सातत्याने चढत असतानाच सत्तरी तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. तालुक्यातील ११ हून अधिक गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी, तो अपुरा आणि अनियमित असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सध्या तालुक्यातील 'दाबोस' जलप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून त्यात कोणताही तांत्रिक बिघाड नाही, असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र, कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढली असून दुर्गम भागातील गावांपर्यंत आवश्यक दाबाने पाणी पोहोचत नसल्याचे चित्र आहे. सत्तरीमध्ये दाबोस, पडोसे, केरी, सावर्डे यांसारखे जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यरत असूनही टंचाईची समस्या सुटलेली नाही. प्रशासनाने सुरुवातीपासूनच योग्य नियोजन केले नसल्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, झर्मे, दाबे, चरावणे, हिवरे आणि म्हाऊस यांसह एकूण ११ गावांची भिस्त पूर्णपणे टँकरवर आहे. म्हाऊस पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या झर्मे गावाला दाबे येथील टाकीतून पाणीपुरवठा होतो, मात्र तेथील पंप वारंवार नादुरुस्त होत असल्याने पुरवठा खंडित होत आहे. दाबे आणि म्हाऊस या गावांची स्थितीही बिकट असून त्यांना टँकरशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

एकीकडे सरकार प्रत्येक घराला २४ तास पाणी देण्याचे आश्वासन देत असताना, प्रत्यक्षात अनेक गावांना दिवसातून केवळ २ ते ३ तास पाणी मिळत आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाळपई येथील पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. दाबोस प्रकल्पाची सध्याची १५ एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) क्षमता वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी या प्रकल्पाचा विस्तार करणे किंवा ५० एमएलडी क्षमतेचा नवा प्रकल्प उभारणे हाच कायमस्वरूपी तोडगा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा