राज्यातील जमिनी गेल्या, आता मासळी परप्रांतीयांना देऊ नका !

पारंपरिक मच्छीमारांची मत्स्य खात्याकडे मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 11:11 pm
राज्यातील जमिनी गेल्या, आता मासळी परप्रांतीयांना देऊ नका !

बाणावली येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना मच्छीमार.

मडगाव : राज्यातील जमिनी आता राजकारण्यांनी परप्रांतीयांना विकून संपुष्टात आणल्या आहेत. आता राज्याच्या सागरी हद्दीतील मासळीही परप्रांतीय बोटी नेत असतील तर स्थानिक मच्छीमारांनी काय करायचे, असा सवाल करत राज्याच्या सागरी हद्दीत येणार्‍या परप्रांतीय बोटींवर कारवाई सुरू राहावी, अशी मागणी बाणावली येथे पत्रकार परिषदेत पारंपरिक मच्छीमारांनी केली.
बाणावली, कोलवा व कासावली किनारी भागातील स्थानिक मच्छीमारांनी किनार्‍याच्या नजीक मासेमारी करण्यासाठी आलेल्या बोटी पकडून मत्स्य विभागाच्या ताब्यात दिल्या होत्या. यानंतर हर्षद धोंड यांनी परप्रांतीय बोटींची बाजू घेत असल्याचा दावा करत स्थानिक मच्छीमारांनी टीका केली. डोमिंगो रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, गोव्याचा किनारा १०५ किमी असून ते या किनारपट्टीला लहान म्हणतात. तसेच राज्याबाहेरील बोटींना पकडून दिल्यास त्यांच्या बोटी महाराष्ट्र व कर्नाटकात पकडण्यात येत असतील तर दुसर्‍याच्या हद्दीत जाणे हेच मुळात चुकीचे आहे. तसेच कोणत्या प्रकारची मासळी पडकली यावरून परप्रांतीय बोटी पकडल्या नाहीत तर त्या किनार्‍याच्या नजीक येत मासेमारी करत असल्याने पकडण्यात आल्या होत्या. तसेच स्थानिक मच्छीमारांनी परप्रांतीय बोटी पकडून कारवाईसाठी मत्स्य खात्याकडे दिल्या. आता त्यातील चार बोटी कारवाईपूर्वीच पळाल्याचे समजते.
मत्स्य खात्याच्या कारवाईवर ताशेरे
या प्रकरणी मत्स्य खात्याच्या कार्यपद्धतीवर मच्छीमारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मच्छीमारांनी पकडून दिलेल्या बोटींपैकी चार बोटी कारवाईपूर्वीच कशा पळाल्या? असा सवाल पेले फर्नांडिस यांनी केला असून याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. मोठ्या बोटींमधून केवळ ५०० किलो मासळी मिळाली असे सांगून विभाग बड्या व्यावसायिकांची पाठराखण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

हेही वाचा