वास्को : धावत्या ट्रेनमध्ये ज्येष्ठ महिलेची लूट; दागिन्यांची बॅग पळवणारा चोरटा जेरबंद

अवघ्या २४ तासांत वास्को पोलिसांनी लावला प्रकरणाचा छडा; ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
वास्को : धावत्या ट्रेनमध्ये ज्येष्ठ महिलेची लूट; दागिन्यांची बॅग पळवणारा चोरटा जेरबंद

पणजी : हुबळीहून वास्कोच्या दिशेने येणाऱ्या वालांकिणी–वास्को एक्सप्रेसमध्ये एका ज्येष्ठ महिलेची बॅग चोरणाऱ्या २४ वर्षीय चोरट्याला वास्को रेल्वे पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली आहे. सावर्डे आणि चांदोर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये ही चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास चक्रे फिरवून कर्नाटक येथील संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.

वास्को रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू वाडे-वास्को येथील रहिवासी असलेल्या ६९ वर्षीय गृहिणी अफरोजा बेगम हुक्केरी यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. अफरोजा या २३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास हुबळी ते वास्को या प्रवासादरम्यान रेल्वे क्रमांक १७३१६ (वालांकिणी–वास्को एक्सप्रेस) च्या जनरल कोचमधून प्रवास करत होत्या. रेल्वे सावर्डे आणि चांदोर दरम्यान असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांची नजर चुकवून त्यांची हँडबॅग पळवली. या बॅगेत ७ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल आणि सुमारे २५० ग्रॅम वजनाचे ६० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण असा एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

अफरोजा हुक्केरी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६:१९ वाजता संशयिताचा शोध घेतला. अंबरीश बेग्गर (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा बागलकोट-कर्नाटक येथील रहिवासी आहे. तो मजुरीचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या आरोपी अंबरीश हा रेल्वे पोलिसांच्या कोठडीत असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुरगावचे पोलीस अधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वास्को रेल्वे पोलीस निरीक्षक अमरनाथ पासी यांच्या नेतृत्त्वाखाली रेल्वे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक कृष्णा तळपी हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. धावत्या रेल्वेमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने प्रवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.



हेही वाचा