काणकोणमध्ये नदीत बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू

नदीवर खेळणे जीवावर बेतले, परिसरात शोककळा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
काणकोणमध्ये नदीत बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू

काणकोण/पैंगीण : काणकोण तालुक्यातील  धुपेमळ-भाटपाल (Bhatpal, Canacona) येथे शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली. वज्रे नदीवर फिरायला गेलेल्या तीन लहान मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण काणकोण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुपेमळ-भाटपाल परिसरातील तीन लहान मुले दुपारी घरच्यांची नजर चुकवून घराशेजारील नदीकाठी गेली होती. खेळता खेळता दोन मुले पाण्यात उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली.  काठावर असलेल्या मुलाने धावत जाऊन घरी माहिती दिली. त्यानंतर घरच्यांची आरडाओरड ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने नदीकडे धाव घेतली. रोहन या युवकाने  दोन्ही बालकांचे मृतदेह बाहेर काढले. 

या दुर्घटनेत ध्रुव वड्डार (वय ७ वर्षे, रा. नवे वाडे) आणि ऋतविक नाईक (वय ११ वर्षे, रा. कारवार) ही मुले मृत्यू पावली. विशेष म्हणजे, मृत ऋतविक हा मूळचा कारवार येथील होता. तो सुट्टीत आपल्या मावशीकडे भाटपाल येथे राहायला आला होता. पाहुणचारासाठी आलेल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.

घटनेची माहिती मिळताच काणकोण अग्निशमन दलानेही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.  अग्निशमन दलाचे (Canacona Fire station) जवान पोहचेपर्यंत स्थानिक नागरिकांनी बचावकार्यात मोठी मदत केली. काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रातून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातील.

परिसरात दुःखाचे सावट

दोन निष्पाप चिमुकल्यांच्या निधनाने वज्रे आणि भाटपाल परिसरात स्मशानशांतता पसरली आहे. नदीकाठी जाताना मुलांनी काळजी घेणे आवश्यक आहे आणि पालकांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे दोन कुटुंबांचे दिवे मालवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


हेही वाचा