‘दृष्टी मरीन’चे दुपारी १२ ते ३ दरम्यान समुद्रात न जाण्याचे पर्यटकांना आवाहन

पणजी : गोव्यातील वाढत्या उष्म्याचा तडाखा लक्षात घेता, राज्य सरकार नियुक्त ‘दृष्टी मरीन’ या जीवरक्षक संस्थेने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची नियमावली जारी केली आहे. कडक उन्हामुळे सनबर्न, त्वचेची जळजळ आणि उष्माघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि दुपारी १२ ते ३ या वेळेत समुद्रात पोहणे टाळावे, असे आवाहन दृष्टी मरीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन अवस्थी यांनी केले आहे.
देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी सहकुटुंब गोव्यात येत आहेत. सध्या गोव्याचे सरासरी तापमान २७ ते ३५ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी आपल्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घ्यावी, यासाठी ही खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.
गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांसाठी सुरक्षित पोहण्याचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. समुद्राच्या सध्याच्या परिस्थितीनुसार, जिथे पांढरे आणि पिवळे बावटे लावलेले आहेत, तिथेच पोहणे सुरक्षित आहे. याउलट, लाल बावटे लावलेल्या ठिकाणांपासून दूर राहावे, कारण ही क्षेत्रे पोहण्यासाठी अत्यंत असुरक्षित मानली जातात.
दृष्टी मरीनने म्हटले आहे की, समुद्रकिनाऱ्यावर फिरताना छत्रीचा वापर करावा आणि सनबर्न टाळण्यासाठी सनस्क्रीन लावावे. घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्यावे. समुद्राच्या पाण्यात उतरण्यापूर्वी ‘रिप करंट्स’ आणि पाण्याच्या खालच्या प्रवाहांची माहिती देणारे फलक वाचणे आवश्यक आहे.
४५० हून अधिक जीवरक्षक तैनात
गोव्यातील ५४ समुद्रकिनाऱ्यांवर दृष्टी मरीनचे ४५० हून अधिक जीवरक्षक वर्षभर तैनात असतात. कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास किंवा अडचण आल्यास जवळच्या जीवरक्षकाशी संपर्क साधावा. प्रत्येक जीवरक्षक टॉवरवर प्रथमोपचाराची सोय उपलब्ध आहे, असेही नवीन अवस्थी यांनी स्पष्ट केले आहे.