लोलये येथील ७४ वर्षीय वृद्धाची व्यथा

आपल्या घराच्या खोली शेजारी बसलेले ७४ वर्षीय मिकू ग्रासियस.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : मोबाईल नंबर नसल्याने आधार कार्ड करता आले नाही. आधार कार्ड नसल्याने ज्येष्ठ नागरिक असूनही सरकारची कोणतीही योजना मिळू शकली नाही. पदवीधर असूनही हालाकीचे जीवन जगणाऱ्या काजळकेर दिनकर लोलये येथील मिकू ग्रासियस (७४) याची ही व्यथा.
बी. कॉम. पदवीधर असलेले मिकू ग्रासियस हे सध्या रोजंदारीवर कामाला जाऊन उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचे वडिलोपार्जित घर जमिनदोस्त झाल्याने ते तात्पुरत्या बांधलेल्या एका खोलीत राहतात. ना नळाचे पाणी, ना शौचालय, ना गॅस सिलिंडर, ना शेगडी, ना पत्नी. ते एकटेच चुलीवर जेवण करून आपली गुजराण करतात. स्थानिक चर्चकडून महिन्याला पाचशे रुपये व रोजंदारीवर कामाला गेल्याने जे कोणी काही देतात त्याच्यावर ते आपल्या पोटाची खळगी भरतात. ७४ वर्षीय या ज्येष्ठ नागरिकाचे आणखी किती हाल पाहायचे.
सरकारने त्यांना मदत करावी, अशी मागणी लोलयेचे नागरिक प्रशांत प्रभुगावकर व इतरांनी केली आहे. सरकारी यंत्रणा या वृद्धाच्या हालाखीची दखल घेतील, अशी अपेक्षा लोलये ग्रामस्थांनी बाळगली आहे.