‘आप’मध्ये मोठी फूट : राघव चढ्ढा यांचा राजीनामा; राज्यसभेतील ७ खासदार भाजपमध्ये जाणार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
53 mins ago
‘आप’मध्ये मोठी फूट : राघव चढ्ढा यांचा राजीनामा; राज्यसभेतील ७ खासदार भाजपमध्ये जाणार

नवी दिल्ली : राघव चढ्ढा (Raghav Chadha)  यांनी आज आम आदमी पक्षातून (Aam Aadmi Party) राजीनामा जाहीर करत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. त्यांनी पक्षात गंभीर फूट पडल्याचा दावा करत, राज्यसभेतील पक्षाचे १० पैकी सुमारे ७ खासदार भारतीय जनता पार्टीमध्ये (Bharatiya Janata Party)  विलीन होणार असल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना चढ्ढा यांनी सांगितले की, पक्ष आपल्या मूळ तत्त्वांपासून दूर गेला असून; “मी योग्य माणूस चुकीच्या पक्षात होतो” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अलीकडेच त्यांना राज्यसभेतील ‘आप’च्या उपनेते पदावरून हटवण्यात आले होते. त्यामुळे पक्षांतर्गंत मतभेद अधिकच तीव्र झाले होते.

या फूटीत संदीप पाठक (Sandeep Pathak)  आणि अशोक मित्तल ( Ashok Mittal) यांच्यासह अनेक वरिष्ठ खासदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हरभजन सिंग, राजींदर गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल  (Harbhajan Singh, Rajinder Gupta, Vikram Sahney, Swati Maliwal) हेही या गटात असल्याची माहिती समोर येत आहे.

ही घडामोड ‘आप’साठी मोठा धक्का मानली जात असून, राज्यसभेतील पक्षाची ताकद लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. २ एप्रिल २०२६ रोजी चढ्ढा यांना उपनेते पदावरून हटवून अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतरच या मतभेदांना उधाण आले होते.

दरम्यान, या संभाव्य विलिनीकरणामुळे राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा