पश्चिम बंगालात ९२.८८ टक्के तर तामिळनाडूमध्ये ८५.१५% मतदान

विक्रमी मतदान कुणाच्या पत्त्यावर; विश्लेषकांमध्ये चर्चा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
53 mins ago
पश्चिम बंगालात ९२.८८ टक्के तर तामिळनाडूमध्ये ८५.१५% मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या टप्प्यांमध्ये यंदा अभूतपूर्व मतदानाची नोंद झाली असून, दोन्ही राज्यांनी मतदानाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील १५२ मतदारसंघांमध्ये तब्बल ९२.८८ टक्के मतदान झाले, जे स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक मानले जात आहे. तर तामिळनाडूमध्येही (Tamil Nadu)  ८५.१५ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यात मागील निवडणुकांच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली.

पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांत ९३ टक्के मतदान 

पश्चिम बंगालमधील (West Bengal) कूचबिहार, बीरभूम, मालदा आणि दक्षिण दिनाजपूर या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मतदानाचा (Voting)  टक्का ९३ टक्क्यांहून अधिक गेला. संवेदनशील व विविधतेने नटलेल्या भागांमध्येही मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.  ज्यामुळे सर्व स्तरांतील नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत प्रचंड उत्साह असल्याचे स्पष्ट झाले.

या विक्रमी मतदानानंतर राजकीय प्रतिक्रिया तीव्र झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या उच्च मतदानाला बदलाची इच्छा दर्शवणारा संकेत मानला आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांनी विरोधकांचे दावे फेटाळत पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला.

राजकीय विश्लेषकांच्या मते, पश्चिम बंगालमध्ये उच्च मतदानाचा इतिहास अनेकदा मोठ्या राजकीय बदलांशी जोडला गेला आहे.  विशेषतः २०११ मधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर मात्र, अंतिम निकाल लागेपर्यंत कोणताही ठोस निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्याचे मतदान बाकी असल्याने ‘बंगालची लढाई’ नेमकी सत्तांतर घडवून आणणार की विद्यमान सरकारची पकड अधिक मजबूत करणार, याबाबत देशभरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुका अलीकडील काळातील सर्वाधिक चर्चेतील आणि लक्षवेधी ठरत आहेत.

हेही वाचा