ईडी अधिकारी म्हणवून घेणाऱ्या संशयिताला कर्नाटकातून अटक

मायना कुडतरी पोलिसाची कारवाई, तीन लाखांच्या लुटीचे प्रकरण

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
32 mins ago
ईडी अधिकारी म्हणवून घेणाऱ्या संशयिताला कर्नाटकातून अटक

मडगाव : माकाझन येथील बँकेबाहेरून अशोक कुमार याचे अपहरण करून, त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन ३ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात मायना कुडतरी पोलिसांना यश आले आहे. निलेश भीमराव जाधव (वय ५३, रा. अकोला, महाराष्ट्र) असे संशयिताचे नाव असून, त्याने स्वतःला अंमलबजावणी संचालनालयाचा अधिकारी (ED officer)  असल्याचे भासवून हा गुन्हा केला होता.

बोर्डा- फातोर्डा येथील रहिवासी अशोक कुमार (५६ वर्षे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. २४ मार्च २०२६ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास माकाझन येथील कॅनरा बँकेबाहेरून निलेश जाधव, बलराम शेट्टी, अजित आणि इतर काही साथीदारांनी अशोक कुमार यांचे त्यांच्याच ह्युंदाई व्हेन्यू कारमधून अपहरण केले होते.

त्यानंतर संशयितांनी तक्रारदाराला कर्नाटकातील (Karnataka)  कारवार येथील एका निर्जन स्थळी नेले. तिथे त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन आणि भीती दाखवून पैशांची मागणी केली. संशयितांनी अशोक कुमार यांच्या कारमध्ये असलेले ३ लाख रुपये जबरदस्तीने लुटून पळ काढला.

या गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांनी अजित कुमार कट्टीमणी (३४ वर्षे, रा. मडगाव) याला अटक केली होती, जो सध्या जामिनावर बाहेर आहे. मात्र, मुख्य संशयित निलेश जाधव हा पोलिसांना गुंगारा देत होता.

मायना कुडतरी पोलिसांनी (Maina-Curtorim Police)  तांत्रिक पाळत ठेवली असता, संशयित निलेश हा कर्नाटकच्या दावणगगिरी येथे असल्याचे समजून आले. तो दावणगिरी येथून बंगळुरूच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मायना कुडतरी पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला गोव्यात आणून २४ एप्रिल रोजी त्याला रीतसर अटक करण्यात आली.

संशयिताला मडगावच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने संशयित निलेश जाधवला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक संतोष देसाई, पोलीस अधीक्षक सिद्धांत शिरोडकर आणि पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रफुल्ल गिरी,  हवालदार गोरखनाथ गावस, पोलीस कॉन्स्टेबल समीर सुधीर आणि चेतन कोळी यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी करत आहेत

हेही वाचा