प्रयत्नांची ‘मन की बात’साठी निवड

पणजी : गोवा राज्य मलेरिया मुक्तीच्या अगदी जवळ पोहोचले आहे. आरोग्य खात्याचे आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये गोव्याला मलेरिया मुक्त (Making Goa Malaria-Free) करण्याची ध्येय असल्याचे राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण (National Vector Borne Disease Control) कार्यक्रमाच्या उपसंचालिका डॉ.कल्पना महात्मे यांनी सांगितले.
जागतिक मलेरिया दिवसानिमित्त (World Malaria Day) पणजीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव, डॉ. मनीष गावणेकर, शुभदा पेडणेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
डॉ. महात्मे म्हणाल्या की, गोव्यात मागील काही वर्षांत स्थानिकांना (इंडिजीनियस) मलेरियाची लागण झालेली नाही. राज्यात २०१८ पासून मलेरिया झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. यामुळे गोवा मलेरिया मुक्तीच्या मार्गावर आहे.
सध्या राज्यात सापडणारे मलेरियाचे रुग्ण हे स्थलांतरित कामगार आहेत. बहुतेक वेळेस बांधकाम प्रकल्प कामगारांमध्ये मलेरिया आढळतो. राज्य आरोग्य कायद्यानुसार आम्ही बांधकाम, जेटी, हॉटेल इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची तपासणी करत आहोत.
त्या म्हणाल्या, याशिवाय खात्यातर्फे स्थलांतरितांच्या वस्तीतही तपासणी मोहीम सुरू आहे. स्थलांतरित कामगारांमध्ये मलेरिया आढळल्यास त्याची राज्यातील आरोग्य खात्यालाही याची कल्पना दिली जाते. गोव्यात प्रत्येक हजार व्यक्तींमागे मलेरिया होण्याचा दर २०२२ पासून शून्य आहे.
खात्याने दक्षिण गोवा जिल्हा मलेरिया मुक्ती प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. याच महिन्यात केंद्रीय अधिकाऱ्यांनी गोव्यात येऊन पाहणी केली होती. सरकारने मलेरिया मुक्तीसाठी केलेले प्रयत्न त्यांना आवडले आहेत. दक्षिण गोवा जिल्ह्याला लवकरच मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळेल अशी आमची अपेक्षा आहे.
‘मन की बात’साठी निवड
डॉ. महात्मे यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत गोव्याने मलेरिया नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान कार्यालयाने देखील दखल घेतली आहे. कार्यालयाने गोव्यात मलेरिया नियंत्रणासाठी राबवलेल्या उपक्रमांची माहिती मागवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येणाऱ्या ‘मन की बात’ मध्ये गोव्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला जाणार आहे.