राज्यात गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये ४ हजारांची घट

नागरी पुरवठा सचिव संजीव गडकर यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd April, 11:41 pm
राज्यात गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये ४ हजारांची घट

पत्रकार परिषदेत माहिती देताना संजीव गडकर. सोबत मधुरेंद्र के. पाण्डेय, नाना मेश्राम व इतर.

पणजी : राज्यात निर्माण झालेल्या युद्धाच्या भीतीनंतर वाढलेले गॅस सिलिंडरचे बुकिंग आता पूर्वपदावर येत आहे. मार्चमध्ये दररोज सरासरी १३ हजार होणारे बुकिंग आता एप्रिल महिन्यात ४ हजारांनी घटून ८ ते ९ हजारांवर आले आहे. गॅस आणि पेट्रोल पुरवठ्याबाबत लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी नागरी पुरवठा सचिव संजीव गडकर यांनी सचिवालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला तेल विपणन कंपन्यांचे राज्य समन्वयक मधुरेंद्र के. पाण्डेय, पीआयबीचे नाना मेश्राम, नागरी पुरवठा संचालक जयंत तारी आणि माहिती व प्रसिद्धी संचालक अभीर हेदे उपस्थित होते.
तणावपूर्ण परिस्थितीनंतर सुरुवातीला दिवसाला सरासरी ११,४१२ सिलिंडर बुकिंग होत होते, जे मार्च २०२६ मध्ये वाढून १३,०३७ वर पोहोचले. मात्र एप्रिलमध्ये ही संख्या घटून दिवसाला सुमारे ८,९५२ इतकी झाली आहे.
ज्यांच्याकडे स्थानिक निवासाचा दाखला नाही, अशा स्थलांतरित कामगारांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी तेल कंपन्यांनी एप्रिल २०२६ पर्यंत सुमारे ११ हजार ‘फ्री ट्रेड’ ५ किलोचे एलपीजी सिलिंडर वाटले आहेत. जेवण बनवण्यासाठी आवश्यक गॅस सहज उपलब्ध व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.गडकर यांनी गॅस वितरणातील सुधारणांवर भर देत सांगितले की, पूर्वी ७०-७५ टक्के असलेले डिजिटल बुकिंग आता ९० टक्क्यांच्या वर पोहोचले आहे. डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड आणि ओटीपीचा वापर आता ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे, जो पूर्वी केवळ ३२-३३ टक्के होता. यामुळे गॅस वितरणात मोठी पारदर्शकता आली आहे. व्यावसायिक सिलिंडरचा साठा ६० टक्क्यांवर राखून ठेवल्याने बाजारपेठ स्थिर ठेवण्यास मदत झाली आहे.
राज्यात १२ दिवसांचा इंधन साठा शिल्लक
इंधन पुरवठ्याबाबत माहिती देताना मधुरेंद्र के. पाण्डेय म्हणाले की, राज्यात सध्या १.१३ कोटी लिटर साठा शिल्लक असून तो पुढील १२ दिवस पुरेल इतका आहे. ९५.९६ लाख लिटर डिझेल साठा शिल्लक आहे. लवकरच ७० लाख लिटर पेट्रोल आणि १.८४ कोटी लिटर डिझेल घेऊन नवे जहाज गोव्यात दाखल होणार आहे. जहाजांची ये-जा नियमित सुरू असल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.                   

हेही वाचा