होंडा येथील प्रकार : घरासह सर्व साहित्य जळून खाक

वाळपई : नारायणनगर होंडा येथील नागनाथ यांच्या घराला गुरुवारी संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नागनाथ यांच्या घराला सायंकाळी पाच वाजता लागलेली ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाने तत्काळ धाव घेत अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणली. मात्र, रात्री आठ वाजता पुन्हा एकदा त्याच घराला आग लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. दुसऱ्यांदा लागलेल्या आगीवरही अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवले असून सध्या आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे.
या घटनेत घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले असून नागनाथ यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र नुकसानाचे स्वरूप अत्यंत भीषण असल्याचे स्थानिकांनी सांगितले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यास पुढाकार घेतला आहे.
नागनाथ हे गेल्या अनेक वर्षांपासून ट्रक दुरुस्तीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आगीमुळे त्यांच्या कुटुंबासमोर उपजीविकेचे संकट उभे ठाकले आहे.