खामिण पाडवा

मार्गशीर्ष प्रतिपदा या दिवशी 'खामिण पाडवा' साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी सुरू असतात. रात्री मखर, नाटकाचा कार्यक्रम असतो. त्याचप्रमाणे श्री देवी खामिण व सातेरी माया यांच्या पदराला मारलेली गाठही पहावयास मिळते.

Story: जत्रा |
3 hours ago
खामिण पाडवा

अपरान्त ही परशुरामनिर्मित भूमी असल्याची आख्यायिका आहे. जंगलातील गुहांमध्ये राहणाऱ्या आदिवासी जमातीला मोकळ्या जागेत आणून त्यांनी शेती करण्यास शिकवले. त्यांना संघटित करण्यासाठी धार्मिक सलोख्याची गरज आहे हे ओळखून मध्यवर्ती ठिकाणी मूठ मूठ माती टाकून मूळमाया सातेरी देवीची प्रतिष्ठापना केली. यामुळेच आज गावात असलेली मंदिरे लोकसंस्कृतीची प्रमुख केंद्र बनली आहेत.

कला व संस्कृती जपणारा प्रदेश म्हणून जगभरामध्ये गोव्याची ओळख आहे. काणकोण ते पेडणेपर्यंत पसरलेल्या गोव्याच्या एका बाजूला सहयाद्रीच्या उंचच उंच पर्वत रांगा दुसऱ्या बाजूला अथांग दर्या-सागर, मध्यभागी डोळ्यांचे पारणे फिटणारी निसर्गरम्य वनराई, कान तृप्त करणारे झुळझुळ वहाणारे झरे, सनई-चौघड्यांच्या कर्णमधूर आवाजाने मन प्रसन्न करणारी मंदिरे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान झालेल्या देव-दैवतांचे शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले उत्सव व उत्सवाच्या ओढीने श्रद्धास्थानाकडे धाव घेणारे लोकमानस भारतीय संस्कृती वैभव संपन्न करीत आहे.

प्राचीन काळापासून आपली भूमी लोकसंस्कृतीसाठी समृद्ध भूमी म्हणून ओळखली जाते. माणूस केवळ शरीराने मोठा होऊन चालत नाही. त्याच्या जोडीला सुसंस्कारांचीही गरज असते. लोकमानस आणि त्यांची जीवनपद्धती यांचा अभ्यास केला तर लोक संस्कृतीची सहज ओळख होते. लोकसंस्कृतीसाठी समृद्ध असलेल्या या भूमीतील मंदिरातून वर्षभर अनेक उत्सव साजरे केले जातात. भाविकांचे श्रध्दास्थान असलेली गावच्या एकजुटीची अशी कितीतरी मंदिरे गोव्याच्या कानाकोपऱ्यातून पहावयास मिळतात.

मांडवीच्या कुशीत विसलेला सावई-वेरे हा निसर्गसंपन्न गाव. सभोवताली डोंगराचे उंच कडे. भातशेती, कुळागरांनी व्यापलेल्या या गावामध्ये मध्यभागी श्री सातेरी मूळ आदिमायेचे मंदिर त्याचप्रमाणे श्री मदनंत, श्री नारायण, श्री खामिण अशी पंचायत मंदिरे पहावयास मिळतात.

कार्तिक अमावास्येच्या दिवशी श्री सातेरी मंदिरामध्ये दिवजोत्सव साजरा केला जातो. पहाटेच्या नीरव शांततेत सुमंगल प्रसन्न वातावरणात सुहासिनी महिला भारतीय वेष परिधान करून हातात विशेषतः मातीपासून बनवलेले, पारंपरिक दिवज घेऊन आदिमाया श्री सातेरी देवीला पाच प्रदक्षिणा घालतात व बँड वादनासह श्री खामिण डोंगर देवालय बोणये येथे प्रयाण करतात. हे मंदिर उंच डोंगरावर असल्याने या भागाला 'खामिण डोंगर’ असे म्हटले जाते. याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते.

खामिणमाया ही मूळ अडवलपाल गावची. काही कारणास्तव देवीने सावईवेऱ्याला स्थलांतर केले. अडवलपालहून 'देवी खामिणी' व 'खामिणी रोदीरो' हे सावई- वेऱ्यातील श्री सातेरी मंदिरात आले. श्री सातेरी मायेने तिचा मान-सन्मान केला व येण्याचे कारण विचारले असता, आपल्याला याच गावात स्थायिक व्हायचे असल्याचे सांगितले. आपल्याला निवांत ठिकाणी राहायचे आहे. तेव्हा जिथे कोंबड्याचा साद आणि मुसळाचा नाद कानी पडणार नाही असे स्थळ मला दाखवा अशी विनंती केली. पूर्वी भाताचे तांदूळ करण्यासाठी घराघरातून मुसळाचा वापर केला जाई. त्याचप्रमाणे कोंबडेही पाळत असत. पहाटे कोंबडा आरवला की सकाळ होत असे आणि मग दिवसभरासाठी लागणारे तांदूळ कांडण्याचा आवाज सुरू होई. त्यामुळेच देवीने निर्जन स्थळ दाखवण्याची विनंती केली असावी. सातेरमाया 'देवी खामिण' व 'खामिण रोदीरो', यांना घेऊन निर्जन अशा उंच डोंगरावर गेली. तेथील डेरेदार वृक्ष, लतावेलींनी वेढलेले घनदाट जंगल देवीला खूप आवडले. तिने त्या ठिकाणी राहण्याची तयारी दर्शविली. संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला. कोल्ह्यांनी कोल्हे-कुईला सुरुवात केली. वाघाच्या डरकाळ्यांनी सारा आसमंत दणाणून सोडला. धनदाट जंगलात काळ्याकुट्ट अंधारात खामिणमाया घाबरून गेली. सातेरीमायेने आपल्या मंदिरात परत जाण्याची तयारी केली. पण खामिणमाया तिला कशीच जाऊ देईना. तिने माया सातेरीला घट्ट धरले. आपल्याला एकटी सोडून जाऊ नकोस अशी कळकळीची विनंती केली. तू आपल्याबरोबर इथेच थांब असा आग्रह केला. त्यावेळी रोदीऱ्याने आपल्याला कोंबड्याशिवाय राहता येणार नसल्याचे सांगितले. त्यावेळी खामिण म्हणाली, 'माझ्या डोळ्याआड तू हवे ते कर' असे म्हणून रोदीऱ्याला तिने आपल्या मागे असलेल्या चाफ्याच्या झाडावर रहायला सांगितले. व आपण सातेरीमायेच्या मांडीवर झोपली. कदाचित झोप लागल्यावर माया आपल्याला एकटी सोडून जाईल या भितीने आपल्या नेसत्या लुगड्याच्या पदराची, सातेर मायेच्या लुगड्याच्या पदराला घट्ट गाठ मारली. जेणेकरून जायला उठली तर आपल्याला जाग यावी.

मार्गशीर्ष प्रतिपदा या दिवशी 'खामिण पाडवा' साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी सुरू असतात. रात्री मखर, नाटकाचा कार्यक्रम असतो. त्याचप्रमाणे श्री देवी खामिण व सातेरी माया यांच्या पदराला मारलेली गाठही पहावयास मिळते.

हेही वाचा