ठाण्यातील हायप्रोफाईल 'कॅसिनो बाबा' जेरबंद

या रॅकेटचे धागेदोरे थेट गोव्यातील कॅसिनोपर्यंत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
16 mins ago
ठाण्यातील हायप्रोफाईल 'कॅसिनो बाबा' जेरबंद

ठाणे : अघोरी पूजेच्या नावाखाली भाविकांना लुटून त्या पैशांवर गोव्यातील कॅसिनोमध्ये मजा मारणाऱ्या एका हायप्रोफाईल भोंदू बाबाचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मंजूनाथ शेट्टी ऊर्फ 'दीक्षित बाबा' असे या आरोपीचे नाव असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट गोव्यातील कॅसिनो आणि तिथल्या एका कॅसिनो मॅनेजरपर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

या भोंदू बाबाचे गोव्याशी असलेले कनेक्शन अत्यंत धक्कादायक आहे. तपासादरम्यान असे समोर आले की, गोव्यातील एका कॅसिनो मॅनेजरसोबत या बाबाचे साटेलोटे होते. पीडितांकडून अघोरी पूजेसाठी उकळलेली रक्कम हा बाबा गोव्यातील पंचतारांकित हॉटेल्स आणि कॅसिनोमध्ये उडवत असे. एका रात्रीत त्याने कॅसिनोमध्ये तब्बल १४ लाख रुपयांचे बिल भरल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. जेव्हा ठाणे पोलीस तपासासाठी या बाबाला गोव्यातील संबंधित कॅसिनोमध्ये घेऊन गेले, तेव्हा तिथले कर्मचारीही त्याचा हा विलासी अवतार पाहून अवाक झाले. त्याच्या या 'कॅसिनो' प्रेमामुळेच आता त्याला 'कॅसिनो बाबा' हे नाव पडले आहे.

दीक्षित बाबाची फसवणुकीची पद्धत प्रामुख्याने भीतीवर आधारित होती. तो श्रीमंत लोकांना "तुमच्यावर करणी झाली आहे" किंवा "तुमचा मृत्यू जवळ आहे" असे सांगून घाबरवत असे. अपत्यप्राप्ती न होणाऱ्या जोडप्यांनाही तो अघोरी पूजेचे आमिष दाखवून गोव्याला येण्यास भाग पाडत असे. गोव्यात आल्यावर तो पीडितांना एका बाजूला ठेवून स्वतः रशियन आणि कझाकिस्तानमधील महिलांच्या सोबतीत कॅसिनोमध्ये अय्याशी करत असे. त्याच्या बँक खात्यातील कोट्यवधींच्या व्यवहारांवरून या रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे, याची कल्पना येते.

सध्या ठाणे पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली असून, गोव्यातील त्या कॅसिनो मॅनेजरचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये कॅसिनोमधील आणखी कोणाचे संगनमत आहे का, तसेच या बाबाने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे गोव्याच्या सहलीवर आणून लुटले आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा