गोवा : स्क्रॅप धोरणांतर्गत आतापर्यंत १,३६६ गाड्या भंगारात

वाहतूक अतिरिक्त संचालक : गाडी मालकांना मिळणार चांगला दर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
गोवा : स्क्रॅप धोरणांतर्गत आतापर्यंत १,३६६ गाड्या भंगारात

पणजी : वाहन स्क्रॅप (भंगार) धोरणांतर्गत राज्यात अधिकृत स्क्रॅपिंग एजन्सीमध्ये गेल्या दोन वर्षांत १,३६६ गाड्या भंगारात काढण्यात आल्या आहेत. या धोरणाविषयी जनतेला अद्याप पुरेशी माहिती नाही. आपली जुनी किंवा बेवारस सोडून दिलेली गाडी कुंडई येथील अधिकृत स्क्रॅपिंग एजन्सी 'मिराय'कडे दिल्यास गाडी मालकांना जुन्या गाडीचा चांगला दर मिळेल, तसेच नवीन गाडी घेताना वाहन नोंदणी शुल्कात सवलतही मिळेल, अशी माहिती वाहतूक खात्याचे अतिरिक्त संचालक राजेश नाईक यांनी दिली.
'पृथ्वी दिना'निमित्त पणजी येथील जुंता हाऊसमध्ये वाहतूक संचालनालयाच्या कचेरीत 'मिराय'तर्फे वाहन भंगारात काढण्याविषयी जनजागृती करण्यासाठी पोस्टर आणि पॅम्पलेटचे अनावरण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त संचालक आणि लीड एजन्सीचे अध्यक्ष राजेश नाईक, 'मिराय'चे संचालक तुषार गर्ग, सहाय्यक संचालक (अंमलबजावणी-उत्तर गोवा) सेड्रिक मोन्तेरो, 'गोवा कॅन' एनजीओचे रोलंड मार्टिन्स आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
गोवा सरकारने नागरिकांसाठी वापरात नसलेल्या आणि बेवारस सोडून दिलेल्या गाड्या भंगारात काढण्यासाठी एक उत्तम विचार मांडला आहे. नाईक यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४-२०२५ या वर्षात सुमारे १४६ गाड्या भंगारात काढल्या गेल्या आणि २०२५-२०२६ या वर्षात हा आकडा वाढून १,२२० पर्यंत पोहोचला आहे.
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्क्रॅप धोरण ३१ सप्टेंबर २०२२ रोजी अधिसूचित केल्यानंतर गोवा सरकारने हे धोरण १८ मे २०२३ रोजी अधिसूचित केले. त्यानंतर एका गुंतवणूकदाराने पुढाकार घेऊन मडकई येथे २९ नोव्हेंबर २०२४ रोजी 'मिराय' कंपनीचा प्लांट सुरू केला, असे नाईक यांनी सांगितले.
बऱ्याच नागरिकांना या धोरणाची आणि मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण माहिती नाही. पूर्वी आरटीओ कार्यालयात गाड्या भंगारात काढण्यासाठी अर्ज करावा लागायचा. गाडीच्या तपासणीनंतर ती स्थानिक भंगारवाल्याकडे द्यावी लागायची, जिथे मिळेल त्या पैशात समाधान मानावे लागायचे. पण आता नव्या धोरणानुसार खास सवलती मिळतात. तुमची गाडी 'मिराय' एजन्सीकडे दिल्यास रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नियमानुसार ती भंगारात काढली जाते. गाडीचे वजन आणि ती किती किलोमीटर चालली आहे, या आधारावर मालकाला ठरावीक मूल्य मिळते. त्याशिवाय 'डिपॉझिट प्रमाणपत्र' मिळते, जे नवीन गाडी घेताना आरटीओमध्ये सादर केल्यास रोड टॅक्समध्ये २० टक्के सवलत मिळते.

नव्या गाडीवर मिळणार भरघोस सूट
जर तुम्ही तुमची जुनी गाडी अधिकृत स्क्रॅपिंग सेंटरमध्ये (मिराय) दिली, तर तुम्हाला एक 'डिपॉझिट प्रमाणपत्र' मिळेल. नवीन गाडी घेताना हे प्रमाणपत्र दाखवल्यास रोड टॅक्समध्ये २०% ते ५०% पर्यंत सवलत मिळू शकते.

बीएस-२, बीएस-४ गाड्यांना प्राधान्य
खूप जुनी (बीएस-२ किंवा बीएस-४) गाडी असल्यास, तुम्हाला रस्ते करात थेट ५०% सूट मिळण्याची तरतूद आहे. या धोरणांतर्गत एका गाडीवर जास्तीत जास्त ७५,००० रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.      

हेही वाचा