जाडेजाची फटकेबाजी; आर्चरचा भेदक मारा

लखनौ : भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर पार पडलेल्या आयपीएल २०२६ च्या ३२ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा ४० धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा डाव १८ षटकांत केवळ ११९ धावांत गडगडला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा लखनौचा निर्णय सुरुवातीला सार्थ ठरला. मोहम्मद शमी (३ बळी) आणि मोहसीन खान (२ बळी) यांच्या भेदक माऱ्यामुळे राजस्थानची अवस्था १०.२ षटकांत ५ बाद ७७ अशी झाली होती. सलामीवीर यशस्वी जैस्वालने १२ चेंडूत २२ धावा केल्या, पण इतर प्रमुख फलंदाज स्वस्त्यात बाद झाले. अशा वेळी अनुभवी रविंद्र जाडेजाने २९ चेंडूत नाबाद ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला डोनोव्हन फरेरा (२०) आणि शुभम दुबे (१९) यांनी साथ दिल्याने राजस्थानने २० षटकांत ६ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारली.
१६० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या लखनौची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या तीन षटकांतच आयुष बदोनी, ऋषभ पंत आणि एडन मार्कराम हे महत्त्वाचे फलंदाज केवळ ११ धावांवर माघारी परतले. सलामीवीर मिचेल मार्शने एकाकी झुंज देत ४१ चेंडूत ५५ धावा केल्या, पण दुसऱ्या बाजूने त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. निकोलस पूरनने २२ धावा केल्या, मात्र तो मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला.
राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली होती. जोफ्रा आर्चरने ४ षटकांत केवळ २० धावा देत ३ बळी टिपले आणि लखनौच्या शेपटीला गुंडाळले. त्याला नांद्रे बर्गर (२ बळी) आणि ब्रिजेश शर्मा (२ बळी) यांनी उत्तम साथ दिली. लखनौचे शेवटचे पाच फलंदाज केवळ २८ धावांच्या अंतरात बाद झाले आणि संपूर्ण संघ १८ व्या षटकांत ११९ धावांवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स: २० षटकांत १५९/६ (रविंद्र जाडेजा ४३*, यशस्वी जैस्वाल २२; मोहम्मद शमी ३/३७, मोहसीन खान २/१७)
लखनौ सुपर जायंट्स: १८ षटकांत ११९/१० (मिचेल मार्श ५५, निकोलस पूरन २२; जोफ्रा आर्चर ३/२०, नांद्रे बर्गर २/२७)