गुजरात टायटन्सचा थरारक विजय!

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीचा १ धावेने पराभव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
34 mins ago
गुजरात टायटन्सचा थरारक विजय!

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ मधील १४ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर १ धावेने निसटता पण ऐतिहासिक विजय मिळवला. २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ २०९ धावांपर्यंतच मजल मारू शकला, ज्यामुळे घरच्या मैदानावर त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात संथ झाली. साई सुदर्शन (१२) लवकर बाद झाला, मात्र त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि जॉस बटलर यांनी डावाला आकार दिला.
शुभमन गिलने ४५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७० धावांची कप्तानी खेळी केली. जॉस बटलरने २७ चेंडूत जलद ५२ धावा कुटल्या.
वॉशिंग्टन सुंदरने मधल्या फळीत ३२ चेंडूत ६ चौकारांच्या जोरावर ५५ धावांचे मोलाचे योगदान दिले, ज्यामुळे गुजरातने २० षटकांत ४ बाद २१० अशी मोठी धावसंख्या उभारली.
दिल्लीकडून मुकेश कुमारने २ बळी घेतले, तर कुलदीप यादव आणि लुंगी एनगिडी यांना प्रत्येकी १ बळी मिळाला.
२११ धावांचे मोठे लक्ष्य समोर असताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. पथुम निसांकाने २४ चेंडूत ४१ धावा करून आक्रमक पाया रचला. त्यानंतर केएल राहुलने ५२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ९२ धावांची जबरदस्त खेळी केली, परंतु दुर्दैवाने तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
नितिश राणाने १० चेंडूत ५ धावा केल्या. डेविड मिलरने २० चेंडूत ४१ धावा करत दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते, पण शेवटच्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने विजय खेचून आणला.
गुजरातच्या विजयात फिरकीपटू राशिद खानचा मोठा वाटा राहिला. त्याने ४ षटकांत केवळ १७ धावा देत ३ महत्त्वाचे बळी (नितिश राणा, समीर रिझवी आणि अक्षर पटेल) घेतले. प्रसिद्ध कृष्णानेही ५२ धावा दिल्या असल्या तरी २ महत्त्वाचे बळी टिपले.
दिल्लीला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी धावांची गरज होती, मात्र गुजरातच्या गोलंदाजीसमोर त्यांना १ धाव कमी पडली. केएल राहुलची ९२ धावांची खेळी या सामन्यातील आकर्षण ठरली, पण राशिद खानच्या अचूक गोलंदाजीने सामन्याचे पारडे गुजरातच्या बाजूने झुकवले.
जोस बटलरचा ​विक्रम
जोस बटलर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याच्या नावावर ५९५ षटकारांसह टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम होता. डावातील आपल्या पहिल्याच षटकाराने त्याने ॲलेक्स हेल्सला मागे टाकत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा इंग्लिश खेळाडू बनण्याचा मान मिळवला. यासोबतच, त्याने आपल्या खेळीत आणखी चार षटकार मारून ६०० षटकारांचा टप्पा गाठला.ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि निकोलस पूरन यांच्या यादीत आता जोस बटलर टी-२० क्रिकेटमध्ये ६०० किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा केवळ पाचवा खेळाडू ठरला आहे. जोस बटलरने आतापर्यंत टी-२० फॉरमॅटमध्ये एकूण ४९६ सामने खेळले असून, त्यामध्ये त्याने ४६७ डावांत फलंदाजी करताना ३४.९८ च्या सरासरीने १३,९६१ धावा केल्या आहेत आणि ६०० षटकार लगावले आहेत. यासह टी-२० क्रिकेटमध्ये ६०० षटकार मारणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – १०५६ षटकार
किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) – ९८२ षटकार
आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज) – ७८४ षटकार
निकोलस पूरन (वेस्ट इंडिज) – ७१२ षटकार
जोस बटलर (इंग्लंड) – ६०० षटकार
संक्षिप्त धावफलक: गुजरात टायटन्स: २१०/४ (२० षटके), शुभमन गिल: ७० (४५), वॉशिंग्टन सुंदर: ५५ (३२), जॉस बटलर: ५२ (२७), मुकेश कुमार: ४-०-५५-२
दिल्ली कॅपिटल्स: २०९/८ (२० षटके), केएल राहुल: ९२ (५२), पथुम निसांका: ४१ (२४), डेविड मिलर: नाबाद ४१ (२०), राशिद खान: ४-०-१७-३, प्रसिद्ध कृष्णा: ४-०-५२-२