चीनच्या वर्चस्वाला आव्हान देणारी पहिली भारतीय महिला

सायप्रस: भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी १५ एप्रिल हा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला. भारताची २४ वर्षीय ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू हिने सायप्रस येथे खेळल्या गेलेल्या 'फिडे चेस कँडिडेट्स स्पर्धा २०२६ चे विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली असून, आता ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या विद्यमान विश्वविजेत्या जू वेनजुन हिच्याशी दोन हात करेल.
अंतिम फेरीत वैशालीसमोर रशियाच्या अनुभवी खेळाडू कॅटरिना लग्नोचे आव्हान होते. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या वैशालीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला.
लग्नोने सिसिलियन डिफेन्सचा वापर केला, ज्याला वैशालीने युगोस्लाव्ह अटॅकने चोख प्रत्युत्तर दिले. १६ व्या चालीपर्यंत वैशालीने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली होती. अखेर ४८ व्या चालीवर लग्नोने आपली हार मान्य केली. त्यावेळी वैशालीकडे वजीर आणि दोन हत्ती अशी भक्कम स्थिती होती.
अंतिम फेरीपूर्वी वैशाली आणि कझाकिस्तानची बिबिसारा असौबायेवा ७.५ गुणांसह बरोबरीत होत्या. मात्र, भारताच्याच दिव्या देशमुखने बिबिसाराला ड्रॉवर रोखून धरले. याचा थेट फायदा वैशालीला झाला आणि ती गुणांच्या जोरावर चॅम्पियन बनली.
या स्पर्धेत वैशाली ही सर्वात कमी रेटिंग असलेली खेळाडू होती. सुरुवातीचे चार सामने ड्रॉ झाले आणि पाचव्या सामन्यात तिला पराभवाचा धक्का बसला. मात्र, खचून न जाता तिने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली आणि सलग विजयांची नोंद करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
२०१६ पासून महिला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेवर चिनी खेळाडूंचे एकछत्री अंमल आहे. गेल्या १० वर्षांत चीनबाहेरचा एकही खेळाडू अंतिम फेरीत पोहोचू शकला नव्हता. वैशालीने हे वर्चस्व मोडीत काढले आहे. क्रीडा तज्ज्ञ आता वैशालीची तुलना डी. गुकेशशी करत आहेत, ज्याने २०२४ मध्ये चीनच्या डिंग लिरेनला हरवून विश्वविजेतेपद पटकावले होते. २०२६ मध्ये वैशाली देखील हीच पुनरावृत्ती करेल, अशी आशा भारतीयांना आहे.