प्रशासनाकडून कलम १६३ नुसार आदेश जारी

पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुरगाव बंदर प्राधिकरणाकडून (एमपीए) शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, मुरगाव उपजिल्हाधिकाऱ्यांनी बीएनएसएसच्या कलम १६३ अंतर्गत परिसरात जमावबंदी लागू केली आहे. हा आदेश ३० दिवसांसाठी लागू राहणार आहे.पुतळा हटवण्याच्या निर्णयाला स्थानिकांकडून विरोध होत असल्याने प्रशासनाने हा आदेश जारी केला आहे. परिसरात काही नागरिकांनी एकत्र येत धार्मिक विधी करून घोषणाबाजीही केली होती. यानंतर तलाठ्यांनी मामलेदारांना सादर केलेल्या अहवालाची दखल घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, पुतळ्याच्या ५० मीटर परिसरात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदीसभा, धरणे आणि मोर्चांवर ३० दिवसांसाठी बंदीभाषण, घोषणाबाजी किंवा शांतता भंग करणाऱ्या कृतींवर प्रतिबंध करण्यात आला आहे.
सुरक्षा व्यवस्था कडक
या परिसरात केवळ एमपीएचे अधिकारी, पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. वास्को उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परिसरात गस्त, व्हिडिओग्राफी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.