गोळीबारात तरुणीचा मृत्यू; संशयित श्वेतला पोलीस कोठडी

केपे प्रथमवर्ग न्यायालयाचा निर्णय


21 mins ago
गोळीबारात तरुणीचा मृत्यू; संशयित श्वेतला पोलीस कोठडी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सांगे तालुक्यातील काजूर येथे मित्रांच्या पार्टीदरम्यान चेष्टा मस्करीत रायफलमधून गोळी झाडल्याने एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील संशयित श्वेत गावडे याला केपे पोलिसांनी अटक करून केपे प्रथमवर्ग न्यायालयासमोर सोमवारी उभे केले. न्यायालयाने संशयित श्वेतची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
काजूर येथील एका घरात रविवारी पाच मित्रांचा गट पार्टीसाठी जमला होता. तिथे एक एअर रायफल होती. संशयित श्वेतने गंमत म्हणून रायफल तन्वीच्या दिशेने रोखली आणि ‘गोळी झाडू का?’ असे मस्करीत विचारत ट्रिगर ओढला. दुर्दैवाने रायफलमध्ये गोळी असल्याने ती थेट तन्वीच्या मानेला लागली आणि अतिरक्तस्रावाने तिचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणात वापरली गेलेली रायफल पार्टी सुरू होती, त्यांची असल्याची माहिती आहे. शेतातील पाखरे हुसकावण्यासाठी तिचा वापर केला जात होता. तन्वी पाळी-कोठंबी येथील एका कंपनीत कार्यरत होती. सुटीनिमित्त मित्रांसोबत काजूर येथे गेली होती. घटनेनंतर केपे पोलिसांनी संशयित श्वेतला ताब्यात घेऊन अटक केली होती. पोलिसांनी भा.न्या.सं. आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गोमेकॉत शवविच्छेदनानंतर तन्वीचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, गोळी लागल्यामुळे झालेल्या अतिरक्तस्रावामुळे तन्वीचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्र जप्त केले. सोमवारी केपे प्रथमवर्ग न्यायालयाने संशयित श्वेतला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.