मान्सूनमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

‘अल निनो’ निर्माण होण्याची शक्यता


27 mins ago
मान्सूनमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : यंदा देशात सरासरीपेक्षा कमी मान्सूनची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. देशात सरासरीच्या ९२ टक्क्यांपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता आहे. याआधी ‘स्कायमेट’नेही अशीच शक्यता वर्तवली होती. मान्सून काळात ‘अल निनो’ वातावरणीय प्रणाली निर्माण होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने सोमवारी मान्सूनचा लांब पल्ल्याचा पहिला अंदाज जारी केला. यानुसार प्रशांत महासागरातील ‘ला निना’ परिस्थिती सध्या कमजोर होत आहे. काही महिन्यांत ती एन्सो न्युट्रल होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये ‘अल निनो’ निर्माण होण्याची शक्यता आहे. अल निनो मान्सूनसाठी पुरक नसते. अधिक तपशीलवार अंदाज मेअखेरीस जाहीर होणार आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता केवळ ६ टक्के आहे. सरासरीहून अती जास्त पावसाची शक्यता १ टक्का, सरासरी एवढ्याच पावसाची शक्यता २७ टक्के, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ३१, तर अत्यल्प पावसाची शक्यता ३५ टक्के आहे. विविध वातावरणीय घटकांचा आणि मॉडेल्सचा अभ्यास करून मान्सूनविषयक लांब पल्ल्याचा अंदाज जाहीर केला जातो.