ट्रम्प यांचा इशारा : अमेरिकेने नाकाबंदी सुरू केल्याने युद्ध भडकणार

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
तेहरान/वॉशिंग्टन : इराण आणि अमेरिका यांच्यातील पाकिस्तानमधील शांतता चर्चा निष्फळ ठरली. आता पश्चिम आशियात युद्धाचे ढग गडद झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याचा आदेश दिला असून, १३ एप्रिल रोजी सायं. ७.३० पासून (भारतीय वेळेनुसार) या समुद्री मार्गाची नाकाबंदी सुरू झाल्याचे अमेरिकन नौदलाने म्हटले आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही इराणविरुद्धची लढाई सुरूच असून युद्धविराम कोणत्याही क्षणी संपवू शकतो, असे विधान केले आहे.
इराणबरोबर पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चेतून कोणताही ठोस पर्याय समोर आला नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी या चर्चेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. वाटाघाटी अपयशी ठरल्यानंतर आता पुढील निर्णयांची जबाबदारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:कडे घेतली आहे. ट्रम्प यांनी इराणची कोंडी करण्यासाठी पावले उचण्यास सुरुवात केली आहे. होर्मुझमधून बाहेर पडणाऱ्या आणि आत प्रवेश करणाऱ्या जहाजांना रोखण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सायंकाळी साडे सातपर्यंतची मुदत दिली होती. मुदत संमाप्त होताच अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकाबंदी सुरू केली. ट्रम्प यांनी स्वत: याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. इराणचे नौदल पूर्णपणे नष्ट झाल्याचे सांगताना त्यांच्याकडे आता केवळ कमी धोक्याची जहाजे शिल्लक आहेत. या जहाजांनी नाकाबंदीच्या जवळ येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर हल्ला केला जाईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.
मुदत संपताच नाकेबंदीला सुरुवात
समुद्रमार्गे अमेरिकेत येणारी ९८.२ टक्के ड्रग्सची तस्करी थांबली आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. होर्मुझमधील माईन्स हटवण्याचे काम अमेरिकेच्या लष्कराने हाती घेतले आहे. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी सुरू केल्याने युद्ध अधिक भीषण वळण घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे....
इराणचाही अमेरिकेला इशारा
होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यासाठी इराणला शुल्क दिलेल्या जहाजांना रोखण्याचे निर्देश डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला दिले आहेत. नाकेबंदीच्या घोषणेनंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणच्या बंदरांना धोका निर्माण झाला, तर पर्शियन खाडी किंवा ओमानच्या खाडीतील एकही बंदर सुरक्षित राहणार नाही, असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.
इराण नौदलाची १५८ जहाजे नष्ट केली आहेत. आम्ही त्यांच्या धोकादायक नसलेल्या ‘फास्ट अटॅक शिप्स’ना लक्ष्य केलेले नाही. यापैकी कोणतेही जहाज आमच्या नाकाबंदीच्या जवळ आले, तर त्यांना नष्ट केले जाईल. ही पद्धत जलद आणि क्रूर असेल.
_ डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
आमचे कमांडर आणि सैन्य शत्रूला सीमेपासून दूर ढकलण्याचे अविश्वसनीय काम करत आहेत. इस्रायलच्या नागरिकांना पूर्ण सुरक्षा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. इराण सातत्याने करारांचे उल्लंघन करत होता, जे अमेरिकेने खपवून घेतले नाही.
_ बेंजामिन नेतन्याहू, अध्यक्ष, इस्रायल