आशा भोसले अनंतात विलीन

शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


18 mins ago
आशा भोसले अनंतात विलीन

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
मुंबई : दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी ४ वा. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल सहा दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलीन झाला. आशाताईंच्या जाण्याने फक्त सिनेसृष्टीच नाही, तर अख्खा देश शोकसागरात बुडाला.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी रविवार, १२ एप्रिल रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी सकाळी ११ वा. आशा भोसले यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, अभिनेत्री नीना गुप्ता, मंगलप्रभात लोढा आणि भय्याजी जोशी, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, राज्यपाल विष्णू देव शर्मा, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तसेच विश्वास नांगरे-पाटील आदींचा समावेश होता. अंत्यसंस्कार करताना मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेते उपस्थित होते.