पणजी :विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच काँग्रेसने गोव्यातील प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वात मोठा बदल केला असून, गिरीश चोडणकर यांची नव्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच एम. के. शेख, आमदार एल्टन डिकोस्टा आणि आमदार अॅड. कार्लुस फेरेरा या तीन नेत्यांवर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या नियुक्तीचे आदेश जारी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल
मागील विधानसभा निवडणुकीनंतर अमित पाटकर यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याची जागा जिंकण्यात पक्षाला यश आले. मात्र, त्यानंतर झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाला मर्यादित यश मिळाले. त्यातच अमित पाटकर यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षात नाराजी असल्याची चर्चा होती.
याच पार्श्वभूमीवर चार महिन्यांपूर्वी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीला अमित पाटकर, गिरीश चोडणकर, विधिमंडळ पक्षनेते युरी आलेमाव, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि अंजली निंबाळकर उपस्थित होत्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यासाठी नेतृत्वबदलाचा निर्णय घेण्यात आला.
- विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने विविध समित्यांची रचना केली आहे.
- प्रचार समितीच्या अध्यक्षपदी युरी आलेमाव यांची नियुक्ती करण्यात आली.
- जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार विरियातो फर्नांडिस यांची निवड झाली.
- समन्वय समितीच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस सार्दिन, तर सहअध्यक्षपदी सुनील कवठणकर यांची नियुक्ती करण्यात आली.
- अध्यक्ष : गिरीश चोडणकर
- कार्याध्यक्ष : एम. के. शेख, एल्टन डिकोस्टा, अॅड. कार्लुस फेरेरा
- खजिनदार : दत्ता नाईक
- प्रचार समिती अध्यक्ष : युरी आलेमाव
- जाहीरनामा समिती अध्यक्ष : विरियातो फर्नांडिस
- समन्वय समिती : अध्यक्ष - फ्रान्सिस सार्दिन, सहअध्यक्ष - सुनील कवठणकर
तामिळनाडूतील कामगिरीमुळे मिळाली संधी
नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात मोलाची भूमिका बजावल्याने गिरीश चोडणकर यांची गोवा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडूचे प्रभारी म्हणून त्यांनी निवडणूक व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
राजकीय कारकीर्द आणि निवडणूक अनुभव
गिरीश चोडणकर यांनी आजवर एकही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक जिंकलेली नसली तरी त्यांनी पक्ष संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री झाल्यानंतर झालेल्या पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर गोवा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्या निवडणुकीत काँग्रेसला ११ जागा मिळाल्यानंतर पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अमित पाटकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.
अमित पाटकर यांच्या कार्यकाळात काँग्रेसला मोठ्या राजकीय धक्क्याला सामोरे जावे लागले. मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली दिगंबर कामत, डिलायला लोबो, केदार नाईक, संकल्प आमोणकर, रूडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई आणि आलेक्स सिक्वेरा यांच्यासह एकूण आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ११ पैकी आठ आमदार पक्ष सोडून गेल्याने काँग्रेसकडे केवळ तीन आमदार उरले.
पाटकर यांच्या योगदानाची दखल
पदावरून हटविल्यानंतर अमित पाटकर हे प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र, अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाचे पक्षाने कौतुक केले असून त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचा उल्लेख काँग्रेसच्या अधिकृत पत्रकात करण्यात आला आहे.
माझ्यावर विश्वास ठेवून अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि अंजली निंबाळकर यांचे आभार मानतो. पुढील वाटचाल आव्हानात्मक असली तरी शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या बळावर आम्ही आमचे लक्ष्य गाठू, असा विश्वास गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला.

