आमदार वीरेश बोरकर - ‘सीईसी’ बैठक निर्णयाशिवाय तहकूब

साडेचार तास चर्चा : कार्यकर्त्यांची कार्यालयाबाहेर मोठी गर्दी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th May, 11:55 pm
आमदार वीरेश बोरकर - ‘सीईसी’ बैठक निर्णयाशिवाय तहकूब

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टीचे (आरजीपी) आमदार वीरेश बोरकर आणि केंद्रीय कार्यकारी समिती (सीईसी) यांच्यातील बैठक कोणताही ठोस निर्णय न घेता तहकूब करण्यात आली. सुमारे साडेचार तास चाललेल्या या बैठकीत आमदार वीरेश बोरकर आणि सीईसी सदस्य अजय खोलकर यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली आणि बैठकीचे वातावरण अक्षरशः तापले होते. दरम्यान, वीरेश बोरकर यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून त्यांचे समर्थक पक्षाच्या कार्यालयाबाहेर जमले होते.

सुमारे ७० दिवसांनंतर पक्ष कार्यालयात हजेरी

आमदार वीरेश बोरकर हे सुमारे ७० दिवसांनंतर पक्षाच्या कार्यालयात आले. त्यांनी मागितलेल्या वेळेनुसारच ही बैठक आयोजित करण्यात आली होती, असे सीईसी सदस्य अजय खोलकर यांनी सांगितले. बैठकीत अजेंडा मांडताना आमदार बोरकर यांनी आरजीपीच्या गेल्या आठ वर्षांतील सदस्यसंख्या तसेच सीईसीमधील सदस्यसंख्येचा तपशील मागितला.

दस्तावेज सादर करण्यासाठी वेळेची गरज

मात्र, इतक्या कमी वेळेत ही माहिती सादर करणे शक्य नसल्याने बैठक तहकूब करण्यात आली, असे अजय खोलकर यांनी स्पष्ट केले. यासंबंधीची माहिती यापूर्वी कोणीही मागितली नव्हती आणि आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

काही सदस्यांचा अजेंड्यावर आक्षेप

काही सदस्यांनी अजेंड्यावर स्वाक्षरी करण्यास नकार देत संबंधित दस्तावेज आधी पाहण्याचा आग्रह धरला. मात्र, एकंदरीत चर्चा सकारात्मक झाली. बोरकर यांच्या समर्थकांना आम्ही बोलावले नव्हते; ती केवळ काही सहकाऱ्यांची बैठक होती, असेही अजय खोलकर यांनी स्पष्ट केले.

आरोपांबाबत स्पष्टीकरणाची मागणी

सीईसी बैठकीत सर्वसाधारण चर्चा झाली आणि समितीकडून चांगले सहकार्य मिळाले. बैठकीत वादविवाद होणे स्वाभाविक होते, मात्र सर्वांचा स्वभाव चांगला होता. आम्ही काही दस्तावेजांची मागणी केली तसेच आमच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण मागितले, असे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.

बैठकीत काही महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. तसेच आमच्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरणही मागितले आहे. पुढील निर्णय आता सीईसीकडून अपेक्षित आहे.
— वीरेश बोरकर, आमदार, आरजीपी
पुढील निर्णय समितीवर

आपण सर्वांनी मिळून गोव्याला पुढे नेण्यासाठी काम केले पाहिजे आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहिले पाहिजे. मात्र, यापुढील सर्व निर्णय केंद्रीय कार्यकारी समितीवर अवलंबून आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार वीरेश बोरकर यांनी दिली.